केवळ ११ हजार जागांवरच शिक्षक भरती

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार जागांसाठी शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता केवळ १० हजार ८०० जागांवरच शिक्षक भरती होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता तब्बल १ लाख २१ हजार उमेदवारांमधून केवळ जवळपास ११ हजार जागांवरच शिक्षक भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या केवळ २ हजार ३०० जागा, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ८ हजार ५०० जागांवर भरती होणार आहे. यासाठी साधारण २० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान पवित्र पोर्टलवर जाहिरात येणार आहे. स्वयंअर्थसहाय्यित शाळा, अल्पसंख्याक शाळा, इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळा, अनुकंपा तत्त्वावरील भरती या सर्व संस्थांमधील शिक्षक भरती पवित्र प्रणालीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षक भरतीच्या जागा कमी झाल्या आहेत.

पदवीधर शिक्षक भरतीसाठी नियमावलीच नाही
खासगी संस्थांच्या भरतीत उमेदवारांना मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरतीत मात्र केवळ अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीतील गुणांच्या आधारे भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदवीधर शिक्षक आणि विनापदवीधर शिक्षक असे दोन संवर्ग आहेत. यातील पदवीधर शिक्षकांची भरती प्रक्रिया कशी करावी याबाबतची नियमावली नसल्यामुळे ४ हजार शिक्षकांच्या जागांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.