एप्रिलपासून मिळणार शिक्षकांचे पगार ऑनलाइन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एप्रिल महिन्यापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाइन करण्यात येणार आहेत. त्यासाठी शालार्थ प्रणालीचे सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी) या कंपनीकडे देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये जानेवारी २०१८ पासून तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मार्च २०१९  पर्यंत ऑफलाइन करण्यात येणार आहे. यासंदर्भात महाआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीसीएसच्या सर्व्हरवर शालार्थ प्रणालीची जी माहिती आहे, ती ३१ जानेवारीपर्यंत महाआयटीचा सर्व्हरवर घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर दोन महिने सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम होईल.

यामध्ये जुन्या सॉफ्टवेअरमध्ये ऑगस्ट २०१७  पर्यंतची माहिती असल्यामुळे त्यानंतरची सर्व माहिती अद्ययावत करावी लागणार आहे. दरम्यानच्या काळात अनेक शिक्षकांना शालार्थ आयडी देण्याचे काम शिक्षण विभागाकडून  केले आहे. या सर्व शिक्षकांची माहिती सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करावी लागणार आहे. त्यानंतर मात्र शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाइन  होतील.

म्हणून एप्रिलपर्यंत पगार ऑफलाइन करण्याचा निर्णय –

शालार्थ प्रणालीच्या देखभालीचे कंत्राट टीसीएस या कंपनीकडे होते, परंतु गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात टीसीएस या कंपनीची मुदत संपल्यानंतर या सॉफ्टवेअरची देखभाल करण्याची जबाबदारी पुन्हा टीसीएसकडे द्यायची की एनआयसीकडे यावर एकमत न झाल्याने अखेर शालार्थ प्रणाली सुरू करेपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑफलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शालार्थ प्रणालीवरून तब्बल ५ लाख ७० हजार कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाइन काढण्यात येत होते. परंतु गेले वर्षभर ही प्रणाली सुरूच झाली नसल्याचे दिसून येत आहे.