पुण्यातील मार्केटयार्डात भरदिवसा थरार… व्यापार्‍याच्या गळ्याला चाकु लावुन 5 लाख लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात दिवसाढवळया गोळीबार, खून अशा घटना गेल्या आठवड्यात घडल्या. पोलिसांनी संबंधित आरोपींना गजाआड देखील केले. मात्र, आज (मंगळवारी) दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्डात एक खळबळजनक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी व्यापार्‍याला हत्याराचा धाक दाखवुन 4 लाख 74 हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेले आहेत. भरदिवसा लुटीची घटना घडल्याने मार्केटयार्ड पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी मार्केटयार्ड परिसरातील बुर्‍हाणी कॉलनी जवळ असलेल्या एका व्यावसायिकाच्या गळ्याला चाकु लावला. धाक दाखवित चोरट्यांनी त्यांच्याकडील 4 लाख 74 हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेले. काही क्षणातच चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती सध्यातरी उपलब्ध होवु शकलेली नाही. मात्र, मार्केटयार्ड पोलिस आणि गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले असून काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकलचा नंबरचा शोध घेतला जात आहे. दिवाळी सुरू असल्याने मार्केटयार्ड परिसरात प्रचंड गर्दी आहे. वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा चाकु गळ्याला लावुन 4 लाख 74 हजार रूपये लुटून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात तुफान गोंधळ चालु होता. गेल्या आठवडयात शहरातील शुक्रवार पेठेत भरदिवसा गोळीबार झाला तर औंध परिसरात भल्या सकाळी खूनाचा प्रकार घडला. त्या दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. मार्केटयार्ड परिसरात भरदिवसा लुटीची घटना घडल्याने व्यापार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमद हुसेन (64) व्यापार्‍याकडील 4 लाख 74 हजार रूपये लुटल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, त्यांच्यावर चाकु हल्‍ला झाला अथवा नाही याबाबत पोलिस अधिक माहिती घेत आहे.