Thackeray सिनेमाच्या ट्रेलरमधून मोदींवर निशाणा : बाळासाहेबांचा खास डायलॉग

मुंबई : वृत्तसंस्था – आजच बहुचर्चित असलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कायमच टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेने आता ‘ठाकरे’ या बहुचर्चित सिनेमामधूनही मोदींना निशाणा केले आहे. त्यांच्या ‘५६ इंची छाती’ला लक्ष्य केले आहे. यासाठी एक खास डायलाॅग या चित्रपटात असल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला हा चित्रपट आहे.

ज्या डायलाॅगद्वारे मोदींवर निशाणा साधला आहे ते वाक्य  बाळासाहेबांच्या अलीकडच्या भाषणांमध्ये ऐकायला मिळालेलं नाही. त्यामुळे हा डायलॉग ऐकताक्षणीच, तो खास मोदींना चपराक लगावण्यासाठीच सिनेमात घेतलाय की काय अशी शंका मनात येते. ‘माणसाची ताकद छाती किती इंचाची आहे त्यावर ठरवत नसतात, ताकद मेंदूत असते’, असा एक डायलॉग या सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तोंडी असल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटामध्ये बाळासाहेबांची हुबेहुब भूमिका साकारली असल्याचे ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. या ट्रेलरने बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. शिवसैनिकांसह देशभरातील बाळासाहेबांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मराठीतील बाळासाहेबांच्या आवाजासाठी सचिन खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे राज्यसभा  खासदार संजय राऊत ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

काय आहे ट्रेलरमध्ये ?
बाळासाहेब ठाकरे यांच्या डोक्यात स्वतंत्र संघटनेचा आलेला विचार आणि त्यानंतरचा शिवसेनेचा झंझावाती प्रवास, बाळासाहेबांचं ज्वलंत हिंदुत्व, मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी, मुंबईत दंगल उसळली असताना त्यांनी दिलेला ‘आवाज’, कामगारांना दिलेला आधार, बाबरी प्रकरणात त्यांनी दिलेली साक्ष, त्यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या मांसाहेब, जावेद मियांदादला लगावलेला ‘षटकार’ हे सगळे प्रसंग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.