‘ठाकरे’ ला आवाज कुणाचा ? बाळासाहेबांचाच ! बदलेला ट्रेलर पाहिलात ?

मुंबई : वृत्तसंस्था- नुकतीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या ‘ठाकरे’ सिनेमातीला दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सर्वत्र त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. असे असले तरी अनेकांना मात्र सिनेमाचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आलेला सचिन खेडेकर यांचा आवाज खटकल्याचे समोर आले. यानंतर आता शिवसैनिक आणि इतर लोकांसाठी आनंदाची बातमी आहे की, हा आवाज मात्र आता बदलण्यात आला आहे. विशेष म्हणजे बदललेल्या आवाजासह ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमधील आवाज हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजा इतकाच खणखणीत आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंनीच हे संवाद म्हटले आहेत असे वाटते आहे. आता हा आवाज बदलेला ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. परंतु हा आवाज कोणाचा आहे हे अद्याप समजलेले नाही.

या सिनेमात अनेक संवाद आहेत ज्या संवादांना हा आवाज अगदी चपखल बसल्याचे दिसत आहे. त्यात मग ‘उठाओ लुंगी बजाओ पुंगी’ सारखा संवाद असेल किंवा ‘८० टक्के मराठी मुलांनाच काम मिळालं पाहिजे’ हा संवाद असेल. यानंतर मात्र आता हा आवाज कोणी दिला? हे जाणून घेण्याची सर्वत्र उत्सुकता असल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आवाज चेतन शशितल यांचा असू शकतो असेही बोलले जात आहे. मात्र याविषयी शिवसेनेने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या खणखणीत आवाजात सिनेमा पाहणे ही देखील ट्रीट असणार आहे. विशेष म्हणजे आता नव्या आवाजातला ठाकरे सिनेमाचा ट्रेलर पाहणे ही पर्वणी ठरली आहे.

ठाकरे या मराठी सिनेमाला  सचिन खेडेकर यांचा आवाज देत ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. परंतु याबाबत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल  संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली होती तेव्हा त्यांनी, ‘यासंदर्भात आमची बैठक झाली असून लवकरच काय तो निर्णय घेऊ’ असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता बदललेल्या आवाजातच सिनेमाचा ट्रेलर युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. तर ठाकरे यांच्या ठाकरे सिनेमाच्या हिंदी आवृत्तीत नवाजुद्दीन सिद्दीकीचाच आवाज आहे. तो अगदी चपखलही बसला आहे.

आता लवकरच बाळासाहेब ठाकरे नावाच्या झंझावाताचा प्रवास या सिनेमातून पाहण्यास मिळणार आहे. या सिनेमात नवाजउद्दीन सिद्दीकी आणि अमृता राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २५ जानेवारी रोजी ठाकरे हा  सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.