आठ जिल्ह्यांमध्ये होणार नाही पोलीसभरती 

नवी मुंबई : वृत्तसंस्था – अमरावती, सोलापूर पोलीस आयुक्तालयांसह सहा पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदांची भरती न करता ती थेट आंतरजिल्हा बदलीने आणि आंतरजिल्हा प्रतीक्षा यादीत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांमधून भरण्यात येणार आहे. त्यामुळे चालू वर्षात होणार्‍या पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया न राबविण्याची परवानगी मिळण्याबाबत या घटक प्रमुखांनी पोलीस महासंचालकांकडे परवानगी मागितली आहे. राज्य पोलीस दलामार्फत होऊ घातलेल्या पोलीस भरतीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचं दिसत आहे. हजारो बरोजगार तरूण असे आहेत जे ग्रामीण भागातील असून पोलीस भरतीच्या आशेवर आहेत. अशा सर्व तरुणांच्या आशेवर पाणी फिरणार असल्याचं दिसत आहे.
ग्रामीण भागातील हजारो तरुण असे आहेत जे पोलीस भरतीसाठी क्लास लावतात. खासगी क्लासेसच्या माध्यमातून शारीरिक चाचणी ते थेट लेखी परीक्षेची तयारी करत असताना ते दिसत आहे. भरतीसाठी हे तरुण 15 ते 20 किमी रोज पहाटे धावण्याचा सराव करतात. परंतु या अथक परिश्रमावर पाणी फिरण्याचे चिन्ह दिसत आहे. कारण ग्रामीण भागातील पोलीस अधीक्षकांनी आंतरजिल्हा बदलीने पोलीस शिपाई पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.