गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दरोड्याच्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१५) साई सिद्धी चौकात सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर वानवडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र दीड वर्षे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. गणेश पवार (वय-२१ रा. शंकर महाराज वसाहत, बालवाडी शेजारी, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस हवालदार श्रीधर पाटील व कुंदन शिंदे यांना वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी साई सिद्धी चौकात थांबला असल्याची माहिती मिळाली. तसेच त्याच्याकडे धारदार हत्यार असून तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी साई सिद्धी चौकात साध्या वेषात सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून एक कोयत जप्त करण्यात आला.

ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक शिवदास गायकवाड, पोलीस हवालदार श्रीधर पाटील, गणेश सुतार, समीर बागसिराज, जगदिश खेडकर यांच्या पथकाने केली.