पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी ५ तासात गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गंभीर गुन्ह्यातील आरोपीला येरवडा कारागृहामध्ये नेत असताना आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. पोलिसांनी आरोपीचा पाच तासाच्या आत शोध घेऊन गजाआड केले. हा प्रकार सोमवारी (दि.१४) सायंकाळी सातच्या सुमारास येरवडा कारगृहासमोर घडला होता. आरोपीला काशेवाडी येथील त्रिकोणी गार्डनजवळून अटक करण्यात आली. सागर दत्ता चांदणे (वय-१९ रा. महादेव वाडी, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सागर चांदणे विरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यामध्ये तो न्यायालयात हजर होत नसल्याने त्याच्याविरुद्ध नॉनबेलबल वॉरंट काढून खडकी पोलिसांनी त्याला अटक केली होती. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात केली. त्याला येरवडा कारागृहात सोडण्यासाठी गेलेल्या खडकी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपीने कारागृहासमोरुन पलायन केले.

खडकी पोलिसांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खडक पोलिसांनी आरोपीचा शोध घेत असताना आरोपी काशेवाडी येथील त्रिकोणी गार्डनजवळ मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. खडक पोलिसांनी याठिकाणी साध्या वेषात सापळा रचून आरोपीला पाच तासाच्या आत गजाआड करुन येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध खुन, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस कर्मचारी विठ्ठल पाटील, संदिप पाटील, रवी लोखंडे, आशिष चव्हाण, बंटी कांबळे, समीर माळवदकर, प्रमोद नेवसे, इम्रान नदाफ, विनोद जाधव, विशाल जाधव, सागर केकाण यांनी केली.