गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहकारनगर पोलीस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. ससून रुग्णालायात उपचारासाठी आणले असताना त्याने पत्नीसह पलायन केले. संजय वसंत नलवडे (वय-२३ रा. पर्वती पायथा) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार आज दुपारी अडीचच्या सुमारास घडला.

संजय नलावडे याला सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपरहणाच्या गुन्ह्यात १३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. आज पहाटे दोनच्या सुमारास छातीत दुखत असल्याने पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सकाळी दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची ड्युटी सुरु झाली. त्याच्यावरील उपचार संपल्यानंतर दुपारी सव्वा दोन ते अडीचच्या दरम्यान पोलीस कर्मचारी त्याच्या डिसचार्जची कागदपत्रे तयार करत होते. याचा फायदा घेऊन आरोपीने पत्नीसह पलायन केले.

काही दिवसांपूर्वी खडकी पोलीस ठाण्यातील आरोपीने येरवडा कारागृहाच्या समोरुन पलायन केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आज अपहरणातील आरोपीने पलायन केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. खडकी येथील पळालेल्या आरोपीला पाच तासाच्या आत पोलिसांनी अटक केली होती.