दुर्दैवी ! लेखनिक न मिळाल्याने अंध विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शालांत परीक्षेत लेखनिक न मिळाल्याने निराश होऊन एका बारावीच्या अंध विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परता दाखवून त्याचे प्राण वाचविले. अनिकेत राजेंद्र सिंगन (वय २०, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो वाडिया महाविद्यालयात शिकतो.

अनिकेत हा मूळचा बार्शी तालुक्यातील असून अनेक वर्षांपासून त्याचे कुटुंबीय पुण्यात राहतात. त्याला वडील नाहीत. त्याची आई धुण्या-भांड्यांची कामे करते. परंतु, दृष्टीहीनतेमुळे त्याला परीक्षेसाठी लेखनिकाची मदत घ्यावी लागते. अंध असूनही त्याने जिद्दीने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आता फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. यामुळे अनिकेत अनेक दिवसांपासून लेखनिकाच्या शोधात आहे. परंतु, त्याला लेखनिक मिळाला नाही. या नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

सोमवारी सकाळी तो पुणे स्थानक येथून कात्रजच्या बसमध्ये बसला. बस लोहियानगर भागात आल्यानंतर अचानक तो बसमधून उतरला. यानंतर तो रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या वाहनांसमोर उभा राहू लागला. यामुळे नागरिकांनी त्याला धरून बाजूला घेतले. या वेळी तो ‘मला मरायचे आहे,’ असे म्हणत होता. नागरिकांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. ही माहिती मिळताच खडक पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अंकुश मिसाळ, पोलिस शिपाई सागर घाडगे, तेजस पांडे यांनी धाव घेतली. अनिकेतला विचारपूस केली असता त्याने परीक्षेला लेखनिक मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्याने सांगितलेली माहिती ऐकून ऐकून पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आले. या वेळी पोलिसांनी त्याची समजूत काढली. तसेच, त्याच्या आईला बोलवून घेतले. त्यांनाही मार्गदर्शन करून दोघांना घरी पाठविले.

मदतीसाठी संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन
अनिकेत लेखनिकाच्या शोधात आहे. पोलिसांनी त्याची समजूत काढल्याने तो आता मदतीच्या प्रतीक्षेत आहे. अत्यंत होतकरू असलेल्या अनिकेतला मदत करू इच्छिणाऱ्यांनी खडक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे.