‘राजकारणासाठी नव्हे तर गोरगरिबांना सेवा देण्यासाठी शिबिरे घेतली जातात’ : विखे

नगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी आरोग्य शिबिरे सातत्याने सुरुच राहणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. राजकारणासाठी शिबिरे घेतली जात नसून गोरगरिबांना सेवा देण्याच्या उद्देशाने शिबिरे घेतली जात आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य शिबिरांचा उपयोग राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप काही कर्तुत्वशुन्य पुढारी करीत आहेत. शिबिरांना गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तालुक्यातील जेऊर बायजबाईचे येथे ३१व्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सुजय विखे म्हणाले की, “म्हणाले, ‘नगर जिल्ह्यात जनसेवा फाउंडेशन व डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ३० पेक्षा जास्त आरोग्य शिबिरे घेतली आहेत. या शिबिराच्या माध्यमातून सुमारे साठ हजार रुग्णांची सेवा झाली आहे. या शिबिराचा उपयोग राजकीय व्यासपीठ म्हणून केला जातो, असा आरोप केला जाऊ लागला आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी विरोधक खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत. काही विघ्नसंतोषी मंडळी आरोग्य शिबिरांना गालबोट लावण्याचे प्रयत्न करत आहेत. काही मंडळी अपप्रचार करीत आहेत. मात्र, आम्ही दिलेल्या रुग्णसेवेमुळे गेल्या काही वर्षांमध्ये डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटल वर लोकांचा विश्वास वाढला आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “आमच्यावर आरोप करणारे पुढारी स्वतः काही करत नाहीत. मी स्वतः डॉक्टर असल्याने आरोग्य शिबिरे घेतो. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, तोपर्यंत आपण कुठल्याही आरोपाला घाबरत नाही. डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा केवळ रुग्ण असतो. आम्ही कधीही त्याचा पक्ष किंवा जात-पात विचारत नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी आरोग्य शिबिरे सातत्याने सुरुच राहणार असे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्यासह पांगरमल, जेऊर, डोंगरगण येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.