एल्गार परिषद : न्यायालयात आरोप पत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून पुणे पोलिसांनी गुरुवारी (दि.१५) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन यांच्या अटकेला ३ सप्टेंबर रोजी ९० दिवस पुर्ण होत आहे. ९० दिवसांत त्यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल न झाल्यास आरोपींना जामीन मिळू शकतो. त्यामुळे दोषारोपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ मिळावी, असा अर्ज करण्यात आला आला होता. त्यानुसार ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपण्याआधीच या प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दोषारोपपत्र सादर केले आहे.

दरम्यान या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांना नसून तो एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली होती. अधिकार नसताना तपास केला म्हणून संबंधित तपास अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती, त्यावर डॉ, पवार यांनी सांगितले होते की, चुकीच्या व्यक्तीने तपास केला असेल ते त्यावर कायद्यानुसार कारवाई करावी.