मेट्रोमार्गावरील दुहेरी उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार – मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – पश्‍चिम पुण्यातील प्रमुख कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मेट्रोच्या उड्डाणपुलासोबतच अन्य वाहनांनाही उपयुक्त ठरणार्‍या दुमजली उड्डाणपुलाचे भुमिपूजन येत्या शुक्रवारी (दि.१६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

कोथरुड, कर्वेनगरपासून अगदी पौड पर्यंतच्या वाहतुकीचा सर्वाधीक ताण असलेल्या कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी, नळस्टॉप आणि स्वातंत्र्य चौकामध्ये कायमच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी नळस्टॉप चौकामध्ये मागील काही वर्षात एकेरी आणि वर्तुळाकार वाहतुकीचे प्रयोग सातत्याने राबविले गेले आहेत. परंतू वाढत्या वाहनांमुळे हे पर्यायही तात्कालीक ठरल्याने हे तिनही चौक जोडणारा सुमारे ५४२ मी. लांबीचा उड्डाणपुल बांधण्याचा प्रस्ताव मागीलवर्षी स्थायी समितीमध्ये मंजुर करण्यात आला. विशेष असे की वनाज ते रामवाडी हा उन्नत मेट्रो मार्गही कर्वेरस्त्यावरून जाणार असल्याने मेट्रो आणि अन्य वाहनांसाठी असा दुमजली उड्डाणपुल बांधण्याची संकल्पना पुढे आली.  वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गाचे काम वेगाने सुरू असून एसएनडीटी कॉलेजपर्यंत पिलर्स उभारणी झाली आहे.

गुजरात दंगल : मोदींच्या अडचणी वाढल्या, सुप्रीम कोर्टात सुनावणी 

या दुहेरी पुलासाठी सुमारे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ३५ कोटी रुपये खर्च पुणे महापालिका करणार आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अंदाजपत्रकात १४ कोटी ६० लाख रुपयांची तरतूदही केली आहे. उड्डाणपुलाच्या कामाचा प्रस्ताव तयार करताना उड्डाणपुलाचे डिझाईन आणि काम महामेट्रोकडेच सोपविण्याचा निर्णय झाला आहे. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ते म्हणाले, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, म्हात्रे पुल आणि पौड रस्त्याने येणारी वाहने नळस्टॉप चौकात आल्यावर मोठ्याप्रमाणावर वाहतुक कोंडी होते. याचा परिणाम लगतच्या चौकांमध्येही होतो. पौड रोडने जाण्यासाठी कर्वेरस्ता हा एकमेव पर्याय असल्याने पश्‍चिम पुण्यातील नागरिकांना या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठीच उड्डाणपुल बांधण्यास प्राथमिकता देउन त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला. मेट्रोमार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे यापुलाचे कामही वेगाने पुर्ण होईल, असा विश्‍वास वाटतो. मेट्रो धावण्यापुर्वी या दुहेरी उड्डाणपुलाचे काम पुर्ण करून अन्य वाहनांसाठी हा पुल सुरू होईल, यासाठी माझे प्रयत्न राहातील.