संतापजनक ! १ दिवसाच्या बाळाची जन्मदात्यांनीच लावली ‘अशी’ विल्हेवाट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या एका दिवसाच्या बाळाला जन्मदात्यांनीच झाडाझुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि २६) सायंकाळी चारच्या सुमारास जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरात ही घटना उघडकीस आली. त्या एक दिवसाच्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी येथील क्षितिज कॉलनी येथील झुडपातून नागरिकांना नवजात शिशुच्या रडण्याचा आवाज येत होता. आवाजाच्या दिशेने जात त्याठिकाणी जाऊन पहिले असता त्यांना एका दिवसाची नवजात मुलगी रडत असल्याचे दिसले. त्यानंतर तात्काळ नागरिकांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेऊन तिला उपचारासाठी औंध शासकीय रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.