‘त्या’ को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा ‘भाऊ’ही आयकर विभागाच्या रडारवर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगरमधील एका प्रतिष्ठित को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा ‘भाऊ’ आयकर विभागाच्या चांगलाच रडारवर आला आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांच्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

आयकर विभागाने सोमवारी शहरातील सात ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले होते. सदर छाप्याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. नियमित कागदपत्रांची पडताळणी व मालमत्तांची विवरणपत्रे आदींची तपासणी केली असल्याचे आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले होते. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात शहरातील प्रतिष्ठित बिल्डर, व्यापारी व काही सहकारी संस्थांच्या अध्यक्षांचा समावेश होता. त्यामध्ये एका नामांकित को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ‘भाऊ’ चाही समावेश आहे. आयकर विभागाने त्यांचे घर व कार्यालयावर छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली. अनेक तास ही चौकशी सुरू होती.

यापूर्वीही सदर संस्थेतवर छापे पडले होते. त्यावेळीही ही संस्था चांगलीच चर्चेत आली होती. आता पुन्हा आयकर विभागाने छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली. सदर संस्थेच्या कागदपत्रांच्या पडताळणीत नेमके काय आढळून आले, याचा तपशील मात्र आयकर विभागाने स्पष्ट केला नाही.