चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरमधील चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. मंदिराच्या प्रवेशद्वारावर फुलांची उत्तम आरास केली होती. पहाटे चार वाजता पुजारी मुकुंद आगलावे यांनी श्रींची महापूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर भाविकांना दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले.

अंगारकी चतुर्थीमुळे भाविकांनी पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याचे देवस्थानचे विश्वस्त आनंद महाराज तांबे, राजेंद्र उमाप यांनी सांगितले. उन्हापासून भाविकांचे संरक्षण व्हावे, यासाठी मंदिर परिसरामध्ये मंडप उभारला होता. नाताळ सणाची सुटी असल्यामुळे भाविकांच्या गर्दीमध्ये वाढ झाली होती. भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून चिंतामणीचे पुजारी आगलावे बंधू यांच्याकडून दर्शनबारीची व्यवस्था केली होती. दर्शनबारीमध्ये पायघड्या, मंडप उभारून सावली केली होती़ त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. दर्शनबारी असल्यामुळे भाविकांना दर्शन कमी वेळेत होत होते. आगलावे बंधू यांच्या वतीने पिण्याचे पाणी, तसेच चिंतामणी सेवा मंडळाच्या वतीने उपस्थित भाविकांना शाबूदाणा चिवड्याचे वाटप करण्यात आले.

श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची दुहेरी रांग मंदिराला वळसा मारून भीमनगर-नायगाव रोडवर गेली होती. थेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने वाहनतळाची व्यवस्था केली होती. मंदिर परिसर स्वच्छतेसाठी आळंदी देवाची येथील स्वकाम सेवाभावी संस्थेच्या महिलांनी सहकार्य केले. सायंकाळपर्यंत भाविकांची गर्दी होती. सायंकाळी सात वाजता हभप गणेशमहाराज फरताळे यांचे कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर छबिना निघाला व त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्त्याच्या कडेला गाडी पार्किंग केल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाºया वाहनांना जॅमर लावून कारवाई केली. त्यामुळे गावात जाणारी वाहतूक सुरळीत झाली होती. देवस्थान गार्ड व होमगार्ड यांनी बंदोबस्तासाठी पोलिसांना सहकार्य केले.