डॉक्टरकडे ५० लाखांची खंडणी मागणारे गजाआड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर येथील डॉक्टरकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी मागणाऱ्यांनी डॉ. सपना चौधरी यांना पत्र पाठवून पैशांची मागणी केली होती. या पत्रात आरोपींनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ओळखत असल्याचे सांगितले होते. तसेच पैसे न दिल्यास पुढे काय करायचे ते आम्ही ठरवू अशी धमकी पत्रातून दिली होती. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

डॉ. सपना चौधरी आणि त्यांचे पती आशिष चौधरी हे दोघे डॉक्टर आहेत. त्यांना दोन मुले असून गांधीनगर येथे आशिष यांचे खासगी रुग्णालय आहे. तर सपना या वर्धा रोड येथील एका खासगी पॅथोलॉजी लॅबमध्ये काम करतात. ८ फेब्रुवारीला सपना यांना एक पत्र आले. त्या पत्रामध्ये ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच सपना यांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यांनी फोनला उत्तर दिले नाही. या संपूर्ण घटनेची माहिती सपना यांनी पतीला दिली. यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली.

आरोपींनी सपना यांच्याशी फोनच्या माध्यमातून संपर्क केल्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश आले. पोलिसांनी आरोपींच्या फोनचे लोकेशन शोधून आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. राधेश्याम सरकार, मोसीन खान, वहीद, फिरोज खान असे या आरोपींचे नावे आहेत. सरकार हा आशिष यांच्या क्लिनीकवर काम करीत होता. फिरोज हा मोसीनचा मोठा भाऊ आहे. तसेच या दोघांवर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.