महामार्गावरील ATM वर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – गॅस करटरच्या सहाय्याने महामार्गावरील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा ग्रामीण गुन्हे शाखेने पर्दाफाश करुन गजाआड केले. या टोळीला विविध ठिकाणाहून अटक केली. आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. महामार्गावरील एटीएम कापण्यासाठी आरोपींनी रायपूर येथून गॅस सिलेंडर चोरले तर नांदेड येथून गॅस कटर विकत घेतल्याची कबूली दिली. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अमरिकसिंग हजारसिंग (वय -३८, रा. पुराणासाला, ता. जि. गुरुदासपूर, पंजाब, ह.मु. नांदेड), जसविंदरसिंग ऊर्फ हॅपी दलविंदरसिंग (वय – २४, रा. खजाला, ता. बाबा बकाला, जि.अमृतसर, पंजाब) आणि हरपालसिंग ऊर्फ हॅपी अमरजितसिंग (रा. पंजाब) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की, कुंभेफळ फाट्यावरील एसबीआयचे एटीएम २३ डिसेंबर रोजी रात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात विक्रमसिंग नेगी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता.

या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, सहायक उपनिरीक्षक गणेश भोसले, गणेश गांगवे, ज्ञानेश्वर मेटे, विनोद तांगडे, संजय तांदळे, योगेश तरमाळे यांनी तपास केला असता घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली. त्यावेळी एटीएम सेंटरपासून काही अंतरावर रस्त्यावर ट्रेलर गाडी उभी दिसली. त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी गाडी आणि चालक अमरिकसिंगची माहिती मिळविली. तेव्हा गाडी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एका ट्रान्स्पोर्टची असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना वर्धा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एटीएम फोडीविषयी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.