सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ‘घेराव’ आंदोलन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोडबाबतच्या प्रश्नांकडे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने येत्या सोमवारी (दि.११) दुपारी तीन वाजता मानवी साखळीव्दारे महापालिका मुख्यालयाला घेराव घालणार आहेत.

याबाबतची माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी आणि म्हाडा क्षेत्रातील वर्षानुवर्षे भिजत पडलेल्या संपूर्ण शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

या सर्व प्रश्नांकडे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी सर्व पक्षीय व सामाजिक संस्थाच्यावतीने हातात गाजर घेऊन मानवी साखळीव्दारे महापालिका मुख्यालयास घेराव घालण्यात येणार आहे. या घेराव आंदोलनामध्ये शहरातील सामाजिक संस्था सर्व विरोधी राजकीय पक्ष व नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.