खळबळजनक ! आजोबाचा डोक्यात दगड घालून खुन, नातवाला लटकवले फासावर

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – देळप शिवारातील शेतात तुरीच्या खळ्यावर रात्री जागलीकरिता गेलेल्या आजोबाचा अज्ञात मारेकऱ्याने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. तर पाचशे फूट अंतरावर झाडाला नातवाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. रामचंद्र तुळशीराम अंभोरे (५५) असे आजोबाचे तर रवी अनिल अंभोरे (१७) असे मृत नातवाचे नाव आहे.

जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी येथील रहिवासी रामचंद्र अंभोरे व त्यांचा नातू रवी रात्री तुरीच्या खळ्यावर जागलीसाठी गेले होते. मात्र सकाळी त्यांचे मृतदेह आढळून आले. रामचंद्र यांचा मुलगा व रवीचे वडील अनिल हे जागलीसाठी शेतात जायचे. सकाळी शेतात गेलेले अनिल यांना आपले वडील रामचंद्र यांचा मृतदेह शेकोटीजवळ पडून असल्याचे दिसला. त्याने घटनेबाबत पोलीस पाटलांना माहिती दिली. दरम्यान जागलीवर गेलेला मुलगा दिसत नाही म्हणून शोध घेतला असता पाचशे फूट अंतरावर बाभळीच्या झाडाला मुलाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. रवीच्या हाताला व दोराला रक्त लागले होते.

यामुळे रवीने आजोबाचा खून करून नंतर आत्महत्या केली असावी, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.