सह दिवाणी न्यायालयात चोरी, वकिलाला अटक

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड येथील सहदिवाणी न्यायालयात वकिलानेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमोर आला आहे. याप्रकरणी एका वकिलाला अटक करण्यात आली आहे. वकिला विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. न्यायायलयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड. यशवंत शिंदे असे अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे.

बीड येथील सहदिवाणी न्यायालयात (कनिष्ठ स्तर) प्रतिक्षा अंदुरकर या लघुलेखिका म्हणून कार्यरत आहेत. २० डिसेंबर रोजी त्यांनी वैद्यकीय कारणांमुळे मध्यान्हापूर्वी अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती. त्यानंतर दुपारी त्या पुन्हा कार्यालयात आल्या. कामकाज करत असताना एका प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी त्या जबाब नोंदणी कक्षात गेल्या. त्यांनी संबंधितांचा जबाब नोंदवून तो संगणकातून ती फाइल त्यांच्या पेन ड्राइव्हमध्ये घेतली अन् पुन्हा त्या आपल्या कक्षात परत आल्या. सायंकाळी कार्यालय सुटण्यापूर्वी पावणेसहाच्या दरम्यान, त्या फ्रेश होण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या कक्षात कुणीच हजर नव्हते.

याच दरम्यान त्यांचा ८ जीबी मेमरी क्षमता असलेला लाल रंगाचा पेन ड्राइव्ह चोरीला गेला. न्यायालयीन कामकाजाशी संबंधित महत्वाची माहिती असलेला पेन ड्राइव्ह चोरीला गेल्याने प्रतिक्षा अंदुरकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस तपासात सीसीटिव्ही फुटेजमध्ये अ‍ॅड. यशवंत शिंदे हे वकील अंदुरकर यांच्या कक्षातून बाहेर पडताना दिसले होते. यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.