महाराष्ट्र सरकारने माझी दखल घेतली नाही, सिंधुताई सपकाळ यांची खंत 

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या कर्नाटक राज्यात अधिक काळ आपण भिक्षा मागून दिवस काढले, त्याच राज्याने कर्नाटक भूषण हा पुरस्कार देवून आपले कौतूक केले. तसेच कौतूक महाराष्ट्र सरकारने करावे, अशी अपेक्षा अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी निवघा येथे व्यक्त केली.

माँ जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांचा संयुक्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, भिक्षेनेच तारले. माणसे जोडली. त्यातूनच घडून २२ देशात व्याख्याने दिली. ७५० च्यावर पुरस्कार मिळाले.

माझ्या आयुष्यातील सर्वाधिक काळ कर्नाटकात गेला आहे. कर्नाटकच्या शाळामधील माझ्या जीवनाचा समावेश झाला. आतापर्यंत चार राष्ट्रपतींकडून मला गौरविण्यात आले. पण महाराष्ट्र सरकारने मात्र अद्याप दखल घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, समाजात वावरतांना मुलींनी अंगभर कपडे घालावेत, पती पत्नीने एकमेकांना समजून घ्यावे, त्यामुळे भांडणे टळतील, आत्महत्या होणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

प्रारंभी माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. बाबुराव कदम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. इंदुताई पाईकराव होत्या. ‘पाटील’चे दिग्दर्शक व अभिनेते संतोष मिजगर, ज्येष्ठ पत्रकार शामकाका लाहोटी यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी गजानन कदम, रामेश्वर बोरकर, बंडू माटाळकर, सुदर्शन कऱ्हाळे, देविदास कल्याणकर, पंजाब सुर्यवंशी, महेश बोरकर, सतीश जारंडे, संतोष सुरोशे, सतीश सातव, किसन सोळंके, राजू तावडे, आदित्य कदम आदींनी परिश्रम घेतले. गजानन जाधव यांनी सुत्रसंचालन केले. को.रा. देशमुख यांनी प्रास्ताविक केले.