ताज्या बातम्या

वडीलांचा राग अन् ‘चिक्की’चा मोह…

बेपत्ता शाळकरी मुलीचा तीन तासात शोध

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- घरगुती कारणावरून वडील रागवल्याने आणि चिक्की खायचा मोह असल्याने बारा वर्षाची मुलगी कोणाला काही न सांगता निघून गेली. मुलगी बराच वेळ न आल्याने पालकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासात त्या मुलीचा सुखरूप शोध घेतला. हा प्रकार काळभोरनगर ते लोणावळा रेल्वे स्थानक दरम्यान घडला. पोलिसांनी तात्पर्य दाखवल्याने नागरिकांनी पिंपरी पोलिसांचा सन्मान केला.

हृदवी महेश लाड (१२, रा. काळभोरनगर) असे मुलीचे नाव आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हृदवी ही काळभोरनगर येथे राहत असून ती सहावीत शिक्षण घेत आहे. गुरुवारी नेहमी प्रमाणे ती शाळेत गेली. सायंकाळी सहाच्या सुमारास स्कूल बस चालकाने तिला नेहमीच्या वेळी सायंकाळी सहाच्या सुमारास काळभोरनगर येथे सोडले. मात्र हृदवी घरी न जाता तेथून बेपत्ता झाली. सायंकाळच्या सात वाजल्या तरी मुलगी परत न आल्याने पालकांनी शोध शोध केली, नातेवाईक,मित्र मंडळी यांच्याकडे चौकशी केली. मात्र हृदवी सापडली नाही.

पालकांनी पिंपरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा कामाला लावून शोध मोहीम सुरु केली. तीन तासानंतर हृदवी लोणावळा रेल्वे स्थानकावर सुखरूप आढळून आली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता वडील तिला किरकोळ कारणावरून रागवल्याच्या राग मनात होता. त्यातच तिला लोणावळा चिक्की खायची होती आणि नुकताच वाढदिवस झाला असल्याने तिच्याकडे पैसे होते यामुळे ती चिंचवड रेल्वे स्थानकावरून लोणावळा येथे गेल्याचे स्पष्ट झाले. आज तिच्या पालकांनी आणि काळभोरनगर मधील नागरिकांनी पिंपरी पोलिसांचा सत्कार केला.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या