जगावेगळे लिप आर्ट : ओठांवर सजवले 3.78 कोटी रुपयांचे हिरे 

मेलबोर्न : वृत्तसंस्था – फेमस होण्यासाठी आणि आपले वेगळेपण दाखवण्यासाठी कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. नेल आर्ट, हेअर आर्ट यांच्याबरोबर आता लिप आर्टही लोकांचे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. ओठांवर लिपस्टिक लावण्याबाबत फोटोसेशन किंवा फॅशन शोच्या रॅम्पवर अनेक वेगवेगळे प्रकार मेकअप आर्टिस्टकडून केले जातात. असाच एक वेगळा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे विश्वविक्रमही झाला आहे. एका मेकअप आर्टिस्टने सर्वात महागडा लिप आर्ट तयार केला असून त्यात चक्क हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील एका मेकअप आर्टिस्टची ही कमाल आहे.
एका माॅडेलच्या ओठांवर 126 हिरे लावण्यात आले. आहेत. ऑस्ट्रेलियाच्या रॉजेंड्रॉफ डायमंड ज्वेलर्सने लावलेल्या या हिऱ्यांची किंमत तब्बल 3.78 कोटी रुपये आहे. ही सर्वात महागडी जीवनकला असल्याचीही चर्चा असताना दिसत आहे. हे हिरे लावणाऱ्या मेकअप आर्टिस्टचे नाव चार्ले मॅकने आहे. तब्बल अडीच तास मेहनत घेतल्यानंतर चार्ले मॅकने खुबीने मौल्यवान हिर्‍यांनी मॉडेलचे ओठ सजवले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या रॉजेंड्रॉफ डायमंड ज्वेलर्सचा  50 वा वर्धापन दिन होता. यानिमित्ताने हा विक्रम करण्यात आला. चार्ले मॅकनेच्या या अप्रतिम लिप आर्टची गिनिज बुकमध्येही नोंद करण्यात आली आहे. जसे एखाद्याचे दात हिऱ्यासारखे चमकताना दिसतात अगदी तसेच या माॅडेलचे ओठ चमकताना दिसत होते. तिच्या ओठांची खूपच चर्चा होताना दिसून आली.