आरटीआय कार्यकर्ता विनायक शिरसाट यांच्या खुनाचा उलगडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आरटीआय कार्यकर्ता व रिपाई शहर उपाध्यक्ष विनायक शिरसाट यांच्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने केला आहे. त्यांचा खून करणाऱ्या तिघा मित्रांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी पैशावरून विनायक शिरसाट यांच्याशी झालेल्या भांडणाचा राग आल्याने खून केला आहे.

धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (३८, शिवणे, मुळ, उत्तरप्रदेश), मुक्तारअली मसीहुद्दीन अली (३४, आंबेगाव मुळ मध्यप्रदेश), महंमद फारुख इसहाक खान (२८, उत्तमनगर, मुळ उत्तरप्रदेश) अशी अटक कऱण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक शिरसाट हे ३१ तारखेपासून बेपत्ता होते. त्यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांची कार जांभूळवाडी येथील एका बांधकाम प्रकल्पाजवळ सापडली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुठा गावाजवळ घाटात आढळून आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करत असताना युनीट तीनच्या पथकाला त्यांच्या मित्रांवर संशय आला होता. त्यातील दोघांना तेलंगणातील मेहबुबाबाद येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर मुख्य संशयित धरमप्रकाश वर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी वर्मा हा पीओपीचा व्यवसाय करतो. पीओपीच्या पैशांच्या देवाण घेवाणीवरून त्यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर शिरसाट यांनी वर्माला शिवीगाळ केली होती. त्याचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्याने साथीदारांसोबत मिळून ३० जानेवारी रोजी विनायक शिरसाटचे अपहरण केले. त्यांना स्विफ्ट कारमध्ये बसवून नेत मारहाण केली. तसेच धारदार शस्त्रांनी वार करून ठार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुठागावाच्या जवळच्या घाटात फेकून दिला. असे सांगितले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त ज्योतीप्रिया सिंह, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय म्हेत्रे, सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे, अनिल शिंदे, दत्तात्रय गरुड, दीपक मते, कर्मचारी मेहबुब मोकाशी, प्रविण तापकिर, रामदास गोणते, संतोष क्षीरसागर, शकील शेख, मच्छिंद्र वाळके, गजानन गणबोटे, रोहिदास लवांडे, विल्सन डिसोजा, संदिप राठोड, अतुल साठे, सचिन गायकवाड, सुजित पवार, कैलास साळुंखे, यांच्या पथकाने केली.