उद्योजकाचा खून ; हात-पाय बांधून मृतदेह झाडात टाकला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील एका उद्योजकाचा खून केल्यानंतर हात-पाय बांधून मृत्यदेह झाडांमध्ये टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

रिकबचंद रायचंद ओसवाल ( ६०, रा. पुणे) असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांवर (अज्ञात) खून व पुरावा नष्ट करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील शिळीम गावातील गावकऱ्यांना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास नाणेदांड डोंगरात झाडामध्ये एक मृतदेह दिसला. त्यांनी या बाबतची माहिती पोलीस पाटल हणुमंत गणपत डेरे यांना तात्काळ दिली.

यानंतर त्यांनी ही घटना भोर पोलीसांना कळविली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पोहचल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्यांना हात-पाय तसेच तोंड पांढर्‍या रंगाच्या रूमालाने बांधलेले असल्याचे आढळून आले. तसेच डोक्यात कठीण हत्याराने मारण्यात आल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तसेच, ओळख पटविण्याचे काम सुुरू केले. सोमवारी दुपारी ती बॉडी पुण्यातील उद्योजक ओसवाल यांची असल्याचे समोर आले.

त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली. यावेळी ओसवाल हे पुण्यातून दि. १० जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे समजले. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रारही दाखल असल्याचे भोर पोलीसांनी सांगितले. खूनातील आरोपींबाबत काही धागेधोरे हाती लागले असून, त्यानुसार तपास करण्यात येत आहे. लवकरच आरोपींना अटक होईल, असे पोलीस उपअधीक्षक पखाले यांनी सांगितले आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे.