‘या’ दोघांना कंटाळून चित्रपट निर्माते सदानंद लाड यांनी केली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे, चित्रपट निर्माते सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी काल सकाळी ‘लाडाचा गणपती’ मंदिरात आत्महत्या केली. त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये बिल्डर सिद्धार्थ ग्रुप व ताहीर भाई यांची नावे समोर आली आहेत. आज सकाळी मंदिर उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
या मंदिराच्या छताच्या अँगलला नायलॉन दोरी बांधून लाड (पप्पू) यांनी गळफास घेतला. या संदर्भात त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मध्ये बिल्डर सिद्धार्थ ग्रुप व ताहीर भाई यांच्या मनमानी कारभारास कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आधारावर त्यांचा मुलगा अंकुर लाड याने बिल्डर सिद्धार्थ ग्रुप व ताहीर भाई यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. या प्रकरणी गु.र.क्र.०९/१९, कलम ३०६, ३४ भादंविनुसार गुन्हा नोंद करून घेण्यात आला आहे.
दरम्यान, सदानंद लाड यांनी पंधराहून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच ज्या मंदिरात त्यांनी आत्महत्या केली ते ‘लाडाचा गणपती’ मंदिर त्यांनीच बांधले होते.