‘त्या’ व्यक्तीच्या कुटुंबियांना अद्याप मदत नाहीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (गुणवंती परस्ते) – दांडेकर पुलाजवळ वीजेचा धक्का लागून बापू मेसा कांबळे यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला सहा महिने उलटूनही त्याच्या परिवाराला नुकसान भरपाईसाठी चकरा माराव्या लागत आहेत. त्यांची चार मुले अनाथ झालेली असताना प्रशासनाला त्यांची किव येत नाही. असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता भरत सुराणा यांनी केला आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. तरीही महावितरण ही बाब मान्य करत नसून काही तुटपुंजी रक्कम देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करत आहे. असाही आरोप त्यांनी केला आहे.

ज्याच्या आधारावर घर चालत होते. त्याचा जीव गेल्यानंतर त्याच्या मुलांच्या भविष्याचा विचार करता महाविरणने त्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे होते. परंतु बापू कांबळे डीपी जवळ का गेला, तेथे कसा गेला, त्याचा तेथे जाण्याचा उद्देश्य काय असे प्रश्न विचारून त्यांनाच दोषी ठरवत त्यांना मदत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होत आहे. मृत बापू कांबळे यांच्या मुलांचा सांभाळ सध्या त्यांचे भाऊ भरत कांबळे करत आहेत. ते टेम्पो चालवून उदरनिर्वाह करत आहेत. त्यांची पाच मुले आणि बापू कांबळे यांची चार मुले अशा ९ मुलांना त्यांना सांभाळावे लागत आहे.

बापू कांबळे यांचे मोठे भाऊ भरत कांबळे यांनी सांगितले, १५ जून रोजी माझा लहान भाऊ बापू मेसा कांबळे पर्वती पायथा येथे चैतन्य हॉस्पीटल जवळ कामासाठी गेला होता. त्यावेळी डीपीच्या दरवाज्याला हात लागल्याने विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला होता. माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मदतीने आम्ही महावितरणचा अहवाल मागितला होता. त्यात संबंधित फिडर पिलरला अद्याप कुलुप लावलेले नाही, ही घचना संबंधित अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे घडली आहे. महावितरण कडून या अहवालाकडे दूर्लक्ष करत असून दत्तवाडी पोलिसांकडूनही यासंबंधात कोणतीही तक्रार नोंदवून घेतली जात नाही. मी ९ मुलांचे पालनपोषण करू शकेल इतकं कमवत नाही. मात्र महावितरणकडून याकडे साफ दूर्लक्ष केले जात आहे.

दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून नकार
माहिती अधिकार कार्यकर्ते सुराणा यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात चकरा मारत आहोत. परंतु दत्तवाडी पोलिस ठाण्याकडून कांबळे परिवारावर समेट करून घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. तसेच उलटसुटल उत्तरे देऊ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कांबळे याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख असताना गुन्हा दाखल करण्यास नकार दिला जात होता. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करू असेही सांगण्यात आले. मात्र तो आल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच त्याच्या पोटात अल्कोहोल नसल्याचे अहवालात म्हटले आहे. असे माहिती अधिकार कार्यकर्ते भरत सुराणा यांनी सांगितले.

यावर महावितरण अधिकारी दराडे म्हणाले की, या प्रकरणात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांची आम्हाला सहानुभुती आहे. ही घटना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे घडलेली नाही. डीपी ला सुरक्षा जाळी लावलेली होती. त्यावेळी दोन्ही दरवाजे लावलेले होते. परंतु तो डीपीजवळ काय करत होता. याचा प्रश्न आहे. तरीही त्याच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये मदत देण्यात आली. मात्र त्यांच्याकडून जास्त मदत मागितली जात आहे. आमच्या नियमानुसार आम्ही मयताच्या कुटुंबियांना चार लाख रुपये नुकसान भरपाई देतो. जर त्यांना जास्त मदत हवी असल्यास ते न्यायालयात जाऊ शकतात.

रस्त्यापासून महावितरणचा डीपी दूर आहे. तो तेथे का गेला होता. डीपीचे दरवाजे बंद होते. त्याने तो दरवाजा उघडला कसा, तो तेथे का गेला होता. त्याला महावितरणने कोणतेही काम सांगितले नव्हते. तरीही तो तेथे काय करत होता. यात महावितरणची काही चूक नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करणात आला नाही. असे दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले.