वरीष्ठ पोलीस निरीक्षकांची वकीलाला शिवीगाळ

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाईन – कामकाजाकरिता तालुका पोलीस ठाण्यात गेलेल्या वकीलाला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणूक दिली. संगमनेर वकील संघाने काम बंद करुन याचा निषेध करुन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हा प्रकार संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी तालुका पोलीस ठाण्यात घडला.

संगमनेर वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. सचिन काशिनाथ डुबे हे न्यायालयीन कामकाजाकरिता सोमवारी (दि.१४) घुलेवाडी येथील तालुका पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक एस.आर. पाटील यांनी अ‍ॅड. डुबे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप डुबे यांनी केला आहे. या प्रकाराचा संगमनेर वकील संघाच्या वतीने आज (बुधवार) एक दिवस काम बंद ठेवून निषेध करण्यात आला. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांना वकील संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

झालेल्या प्रकाराबाबत दोन्ही बाजू पडताळल्या जातील. त्यानंतर पोलीस अधीक्षकांकडे अहवाल सादर केला जाईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी सांगितले.

आरोपीच्या अटकेसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा

पाथर्डी : संत भगवानबाबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या स्वप्नील शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तालुक्यातील भगवानभक्तांनी पाथर्डी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चाच्या पूर्वी आंदोलकांनी नाईक चौकात स्वप्नील शिंदे यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले. पोलिस उपनिरीक्षक दिनकर मुंडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे संत भगवानबाबांच्या पुतळ्याचा काही भाग जाळून पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.