सेक्स रॅकेट चालविण्यासाठी त्यांनी गोव्यात बंगलाच घेतला भाड्याने 

पणजी : वृत्तसंस्था – हिवाळा हा गोव्यातील पर्यटनांचा हंगाम. जगभरातून विशेषत: युरोप, अमेरिका, रशियातून लाखोंच्या संख्येने पर्यटक गोव्यात दरवर्षी येत असतात. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून आता गोव्याची नोंद झाली आहे. पर्यटनाबरोबर त्याला चिटकलेला वेश्या व्यवसायही आता मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातूनच एका महिला दलालने पेडणे येथील एक बंगलाच भाड्याने घेतल्याचे आढळून आले. गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या छाप्यात ही बाब उघडकीस आली आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाने छापा घालून मैना या टोपण नावाने वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिला दलाल हिला अटक केली आहे. या ठिकाणी तीन तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जाता होता. त्यांना मेरशी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. त्यातील दोन तरुणी या मुंबईच्या असून एक अहमदनगर जिल्ह्यातील आहे. या तरुणींना गेल्या तीन दिवसांपासून या बंगल्यात आणण्यात आले होते.

मैना नायक ऊर्फ तबसूम मसशैद अली ही या संपूर्ण सेक्स रॅकेटची प्रमुख असून तीच गिऱ्हाईक मिळविण्याचे काम आॅनलाईन पद्धतीने करत होती. पैशांचे व्यवहारही तीच करीत होती. असे असले तरी एवढा मोठा व्याप मैना एकटी सांभाळून शकत नाही. त्यासाठी तिच्या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

बंगल्यात ठेवल्या गेलेल्या युवती गोव्यात कुणी आणल्या ? बंगला भाड्याने घेण्यासाठी व्यवहार व करार कूणी केले ? गिऱ्हाईकांशी कोण संपर्क करतो ? अशा अनेक प्रश्नांची माहिती, उत्तरे तिच्याकडून पोलीस मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.