पुण्यातील व्यावसायिकाला इटलीमध्ये गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला इटलीत व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तिघांनी वेगवेगळ्या बहाण्याने ५ हजार युरो आणि १० हजार पौंड घेऊन फसवणूक केली. तसेच तेथील वाहन परवाना, हेल्थ कार्ड तयार करण्यासाठी फोटो व कागदपत्रांवर सह्या घेऊन बनवाट कागदपत्रे तयार करून फसवणूक केली. हा सर्व प्रकार इटली व लंडन येथे घडला. भारतात परतल्यावर व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल अनिरुद्ध शेवलेकर (३१, केशवनगर, मुंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तमीमी तमीम व सीमोना पीएझा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल शेवलेकर यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांना विदेशात फर्निचरचा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्या व्यक्तीने त्यांन इटलीतील तमीमी याच्याशी ओळख करून दिली. ऑक्टोबरमध्ये ते इटलीला गेले. त्यावेळी तमीमी याने त्यांना तेथे काही फ्लॅट व ठिकाणे व्यवसायासाठी दाखवली. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून ५ हजार युरो घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून चार पाच वेगवेगळ्या फॉर्मवर सह्या घेत फोटोही घेतले. तसेच काही दिवसांनी ते लंडनला गेल्यावर त्यांना तेथे एका मुलाला भेटण्यास सांगून १० हजार पौंड देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना फेब्रुवारी मध्ये तेथील फ्लॅटचा ताबा मिळणार असल्याचे सांगितले. काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा त्यांना फोन आला की तमीमी हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तुम्ही इटलीला येऊ नका असे सांगितले. तसेच त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून काही ओळखपत्रे तयार करून त्याचा गैरवापर केल्याचाही त्यांना संशय आहे. त्यामुळे त्यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित वाळके करत आहेत.