‘दाऊद’ला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश

अमळनेर : पोलीसनामा ऑनलाईन – अमळनेर शहरात चालता-बोलता तलवारहल्ला, चाकू खुपसल्यावर संबंधित जखमींचे फोटो फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर टाकून दहशत निर्माण करणारा फेसबुक डॉन शुभम देशमुख ऊर्फ ‘दाऊद’ यास अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. न्यायालयीन कोठडीतून पोलिसांच्या हाती तुरी देत ६ डिसेंबर २०१८ ला तो पळाला होता. त्यानंतर त्याने थेट जिल्हा पोलिसांनाच आव्हान देत तशा पोस्ट फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर व्हायरल झाल्याने पोलिस दलाची नाचक्की झाली. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेऊन सतत फॉलोअप सुरू ठेवला. त्यामुळे मंगरूळ (ता. अमळनेर) येथील सेंट मेरी स्कूलसमोरील शेतात दारू पिण्यासाठी आला असताना त्यास सिनेस्टाइल झटापटीनंतर अटक करण्यात आली.

शुभम न्यायालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार झाला होता. तेव्हापासूनच त्याची हिंमत वाढून त्याने ३१ डिसेंबरला अमळनेरमधील दाबेली विक्रेत्याने त्याच्यासंदर्भात तक्रार दिल्यावरून तलवारहल्ला केला होता व जखमीचे फोटो फेसबुक, व्हॉटस्‌ॲपवर व्हायरल केले. तसेच पोलिसांनाही फेसबुकवर आव्हान दिले. त्यामुळे अमळनेर पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले. मात्र, तरीही दीड महिना होत आल्यावर त्याची माहिती कुणी देत नव्हते. अखेर आज पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या.

सिनेस्टाइल अटक

 

पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांना शुभम सेंट मेरी स्कूलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांच्यासह किशोर पाटील, प्रवीण पाटील, मिलिंद बोरसे, रवींद्र पाटील यांचे पथक सोबत घेत खासगी वाहनाने त्यांनी परिसराला साध्या वेशातच वेढा घातला होता. सायंकाळी सव्वा सहाला शुभमचे वडील मनोज देशमुख नजरेस पडले. परिणामी तो येणार असल्याची खात्री झाल्यावर दोन तास वाट धरून बसल्यावर शुभम सेंट मेरी स्कूलच्या मागील बाजूने आला. याचवेळी त्याच्यावर झडप घातला. यावेळीही त्याने प्रतिहल्ला चढविल्याने दोन पोलिस किरकोळ जखमी झाले.

विविध गुन्ह्यांत ‘वॉन्टेड’

 

शुभम देशमुखने २०१३ मध्ये घरफोडी केली होती. यावेळी बालगुन्हेगार असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली होती. त्यानंतर त्याच्यावर चोरीचे दोन गुन्हे, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तीन, तसेच एक खुनाचा असे सद्यःस्थितीत त्याच्यावर २१ गुन्हे दाखल आहेत. गेल्या सहा डिसेंबरला घरफोडीच्या प्रकरणात त्यास अटक झाली होती. न्यायालयात त्यास हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.