पतंग उडवताना टेरेसवरुन पडून १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पतंग उडवत असणाऱ्या १२ वर्षाच्या मुलाचा इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली. मुलगा बिल्डींगच्या टेरेसवर पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना बिल्डींगच्या टेरेसवरुन पाय घसरुन तो खाली पडला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१६) घडली.

ओम धनंजय आतकरे (वय-१२) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. धनंजय आतकरे यांनी पोलीसनामाशी बोलताना सांगितले की, त्यांची दोन मुले टेरेसवर पतंग उडवत होते. मोठ्या मुलाला आईने बोलवून घेतले. तो खाली आला असता ओम टेरेसवर एकटा पतंग उडवत होता. ओमने सकाळपासून नाष्टा न केल्याने आईने मोठा मुलगा आदित्यला ओमला बोलवून आणण्यास सांगितले. आदित्य ओमला बोलवण्यासाठी टेरेसवर गेला असता त्या ठिकाणी ओम दिसला नाही. त्याने ओमचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो दिसला नाही त्याचा पतंग आणि मांजा टेरेसवर पडलेला दिसला. आदित्यने टेरेवरुन खाली वाकून पाहिले असता ओम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याने घरी जाऊन सर्व हकिकत आईला सांगितली. तसेच वडिलांना फोन करुन सांगितली. ओमला तात्काळ भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा तपासणीपूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

आतकरे परिवार तीन महिन्यांपूर्वी कात्रज येथील गोकुळनगर मधली हेमी पार्क बिल्डींगमध्ये राहण्यास आले होते. या ठिकाणी त्यांनी नवीन घर घेतले असून या इमारतीचे काम अद्याप सुरु आहे. आतकरे राहत असलेल्या बिल्डींगच्या शेजारी दुसऱ्या एका बिल्डींगचे काम सुरु आहे. या बिल्डींगच्या टेरेसवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी किंवा दरवाजा नाही. या ठिकाणी दरवाजा अगर जाळी असती तर हा अपघात झाला नसता असेही ओमच्या वडिलांनी सांगितले. ओमचा २८ फेब्रुवारीला वाढदिवस होता. आपला १३ वा वाढदिवस नवीन घरात साजरा करण्यासाठी त्याच्यासह आतकरे कुटुंबीय उत्सुक होते. मात्र या घटनेनंतर आतकरे कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.