पुलवामा हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाने केले ‘हे’ मत व्यक्त

न्यूयार्क : वृत्तसंस्था- भारत, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी ‘तत्काळ निर्णय’ घ्यावा, असे संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस म्हणाले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावावर संयुक्त राष्ट्र संघाने नाराजी व्यक्त केली आहे.

अँटोनिओ गुटेरेस म्हणाले की, ‘सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांनी संयम राखावा, तणाव कमी करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत. दोन्ही देश तयार असतील तर याबाबत आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत.

पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रात धाव –
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडण्यात आले असून त्यांची आर्थिक कोंडी करण्यात आली आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे भयभीत झालेल्या पाकिस्तानने संयुक्‍त राष्ट्रांकडे धाव घेतली आहे. भारत-पाकमधील तणाव कमी करण्याची विनवणी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी संयुक्‍त राष्ट्राला पत्र पाठवून केली आहे.

या पत्रात पाकने म्हटले आहे की, पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. भारताकडून पाकिस्तानविरोधात होणार्‍या संभाव्य कारवाईमुळे आमच्या क्षेत्रात बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो. दोन्ही देशांनी आपापल्या उच्चायुक्‍तांनाही परत बोलावून घेतले आहे. भारताने पाकिस्तानी वस्तूंवरील सीमाशुल्कात वाढ केली आहे. भारतीय लष्कराकडून युद्धाचा इशारा वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात संयुक्‍त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी तत्काळ मदत करून, दोन्ही देशांतील तणाव कमी करावा, असे पाकने या पत्रात नमूद केले आहे. भारताने मात्र दोन्ही देशांत संयुक्‍त राष्ट्रासह त्रयस्थ देशांची मध्यस्थी अमान्य केली आहे.