‘त्या’ महिलेला Social Media वरील ‘प्रेम’ पडलं ८ लाखात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरुन घरातील तिजोरीतील ८ लाख ८ हजार रुपयांचे दागिने आणि रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना खराडी भागातील एका उच्चभ्रु सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेच्या ४३ वर्षीय मुलाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक असून ते खराडी परिसरातील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्या सोबत त्यांची आई देखील राहते. त्यांच्या आईला जुलै २०१८ मध्ये एका अनोळखी इसमाने फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली. आईने ती स्विकारल्यानंतर अनोळखी इसमाने त्यांच्यासोबत चाटींगद्वारे संवाद वाढवला. त्यावेळी या व्यक्तीने ‘मला आई-वडिल नाहीत. मला घरातून बाहेर काढण्यात आले आहे, अशी बतावणी अनोळखी व्यक्तीने तक्रारदार यांच्या आईकडे केली होती. ओळख वाढल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये अनोळखी व्यक्ती दोन ते तीन वेळा त्यांच्या घरी आला होता.

मागील वर्षी तक्रारदार हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यावेळी त्यांची आई घरामध्ये एकटीच होती. त्यावेळी अनोळखी व्यक्ती घरी आला होता. तक्रारदार यांची आई स्वयंपाकाच्या घाईत असताना त्यांचे लक्ष नसल्याचे पाहून त्याने घरातील तिजोरीच्या चाव्या चोरल्या. त्याने तिजोरीतील रोकड, सोने-चांदीचे दागिने आणि दोन घड्याळे चोरुन पसार झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक तपास करत आहेत.