‘या’ महिलेने आतापर्यंत केली आहे 13 हजारांहून अधिक मृतदेहांची चिरफाड

बिहार : वृत्तसंस्था – आत्तापर्यंत आपण पहिले असेल की शवविच्छेदन विभागात फक्त पुरुषच काम करतात पण आम्ही आज आपणाला एका अशा महिले बाबत माहिती देणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यात 13 हजारांहून अधिक मृतदेहांची चिरफाड केलेली आहे. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटणे साहजिक आहे. परंतु बिहारच्या मंजू देवी नामक एक महिला तब्ब्ल 14 वर्षांपासून या विभागात शवविच्छेदनाचे काम करत आहेत. एवढेच नाही तर एखाद्या दिवशी त्या रजेवर असतील तर त्यांच्या वाचून शवविच्छेदनाचे काम थांबते.

….या कामाचा प्रतिदिवस त्यांना मिळतो एवढा पगार 
बिहार मधील समस्तीपूर जिल्ह्यात राहणाऱ्या 45 वर्षीय मंजू देवी १४ वर्षांपासून या क्षेत्रात असून त्यांना या कामाचे प्रति दिवस  १०८ रुपये दिले जातात. एखाद्या दिवशी जर मृतदेह आलाच नाही तर त्यांना पैसे देखील मिळत नाहीत. कामाचा रोज वाढविण्या संदर्भात त्यांनी अनेकदा डॉक्टरांकडे विनवणी केली. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. शिवाय केलेल्या कामाचे पैसे देखील दिले जात नाहीत. त्यांनी २००८ साली याबाबाद पटणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. एक वर्षांनंतर कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तरी देखील अद्याप हे प्रकरण जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे.

मंजू देवींनी का स्वीकारले हे काम ?  
मंजू देवींचे सासरे म्हणजेच रामजी मल्लिक हे देखील यापूर्वी शवगृहात काम करायचे. त्यांच्या निधनानंतर पत्नी भोला देवी यांना त्यांच्या जागेवर कामावर ठेवण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी मंजू देवी यांच्या पतीचे देखील निधन झाले पतीच्या मृत्यूनंतर मंजू देवी देखील सासूसोबत शवगृहात त्यांना मदतीसाठी जाऊ लागल्या. कालांतराने त्यांनी देखील शवविच्छादनाचे काम शिकून घेतले. सासूच्या मृत्यूनंतर मंजू देवींना शवगृहात रोजंदारीच्या हिशेबाने नोकरी मिळाली. सुरवातीला त्यांना या कामाची भीती वाटायची परंतु कुटुंबाचा गाडा पुढे ओढण्यासाठी त्यांना हे काम करणे गरजेचे होते. यामुळे सर्वकाही मनातली भीती बाजूला सारून जवळपस १४ वर्षांपासून त्या हे काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या कामाच्या जोरावर एका मुलीचे लग्न देखील केले आहे.