चऱ्होलीत भर दिवसा दरोडा ; मारहाण करुन लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चऱ्होली बुद्रुक येथे पत्र्याच्या शेडमध्ये पैसे मोजत बसलेल्या तिघांना १० ते १२ तरुणांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण करुन त्यांच्याकडील ६५ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले.

या प्रकरणी आळंदी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भागवत शिवाजी मोरे (वय २८, रा. एल आय सी बिल्डिंग, निलप्रभा सोसायटी, यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा टुर अँड ट्रव्हॅल्सचा व्यवसाय असून ते मुळचे जालना जिल्ह्यातील राहणारे आहेत. चऱ्होली बुद्रुक येथे शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते त्यांचे मित्र दत्ता नाईक, बालाजी बीडकर हे पत्र्याच्या खोलीचा दरवाजा बंद करुन मोरे यांच्याकडील पैसे मोजत होते. यावेळी २० ते २२ वर्षाच्या १० ते १२ जणांनी दरवाजावर लाथा मारुन तो उघडला. मोरे व त्यांच्या मित्रांना लोखंडी कोयता, लाकडी दांडक्याने तसेच लाथा मुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील ६५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते पळून गेले. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधर अधिक तपास करीत आहेत.