पुण्यात माजी पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यात चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माजी पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांच्या बालेवाडीतील मिटकॉन महाविद्यालयासमोर असलेल्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. बंगल्यात जास्त सामान नसल्याने चोरट्यांच्या हाती केवळ एक सेट टॉप बॉक्स लागला आहे. हा प्रकार लक्षात आल्यावर बंगल्याची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली.

याप्रकरणी त्यांच्या पत्नीने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी परिसरातील मिटकॉन महाविद्यालयाजवळ माजी पोलीस महानिरीक्षक यांचा बंगला आहे. ते आणि त्यांचे कुटुंबिय मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. बालेवाडी येथील घरी ते अधूनमधून येतात. बंगल्यात सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. चोरट्याने बंगल्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी बंगल्यातील मौल्यवान वस्तूंऐवजी चोरट्याने सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून डिव्हीआर लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकिस आले.. चित्रीकरणात चोरट्याची छबी कैद झाली आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.