पुण्यातील वाकडमध्ये भरदिवसा २ घरफोड्या, परिसरात भितीचे वातावरण 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन –  वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. यामध्ये थेरगाव आणि पुनावळे येथे घरफोड्या करण्यात आल्या असून 3 लाख 96 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

प्राची निलेश तिकोणे (27, रा. अभिजित पार्क, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्राची यांचे घर सकाळी दहा ते दुपारी पावणे तीनच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सुमारे 3 लाख 26 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

दुस-या घटनेत लीलाधर शरद राणे (36, रा. संत तुकाराम ब्रिज जवळ, पुनावळे) यांनी फिर्याद दिली आहे. लीलाधर हे नोकरी करतात. नोकरीसाठी ते सकाळी आठ वाजता घराला कुलूप लावून घराबाहेर पडले. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 70 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी सहा वाजता लीलाधर घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

भरदिवसा घरफोड्या झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास वाकड पोलीस करीत आहेत.