पोलिसातील माणूसकीमुळे त्यांची झाली भेट

सोलापूरः पोलिसनामा आॅनलाईन

अनेकदा आरोप होणारी खाकी आज मात्र त्यांनी केलेल्या कामामुळे सोलापूरात चर्चेचा विषय बनली आहे. सोलापूर शहर पोलीस दलातील पोलिसांनी शनिवारी सकाळी एका निराधार अपंग व्यक्तीस पोटभर जेवण घातले. यावेळी दुसऱ्या एका पोलीस सहकाऱ्याने त्याचे चित्रण केले आणि तो व्हिडीअो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडीअो पाहून त्या अपंग वृद्धाचे नातेवाईक सोलापूर शहरात दाखल झाले व आपल्या वडिलांना पाहूण पप्पा अो पप्पा कुठे गेला होता अशी अार्त हाक दिली.

भिकाजी पानसरे (वय-90, रा. भायखळा, मुंबई) असे वृद्धाचे नाव आहे. फेब्रुवारी 2018 पासून मुंबई येथील राहत्या घरातून ते बेपत्ता झाले होते. मागील काही महिन्यांपासून ते सोलापूरात भीक मागून खात होते. स्मरणशक्ती हरवल्यामुळे अज्ञात वाहणात बसून ते सोलापुरात आले होते. त्यांच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल केली होती. तसेच मुंबई येथील प्रत्येक ठिकाणी बेपत्ता झाल्याची पत्रके वाटली होती.

भिकाजी पानसरे हे पेशाने इलेक्ट्राॅनिक इंजिनिअर आहेत. मुंबई येथे त्यांचा आंब्याचा व्यावसाय आहे. वाढत्या वयानुसार शरीराने साथ सोडली त्यामुळे स्मरणशक्ती लोप पावली. फेब्रुरवारीमध्ये घरातून बाहेर पडलेले भिकाजी घरी परतलेच नाहीत. त्यानंतर काही महिन्यानंतर पोलिस जेवण खाऊ घालत असल्याचा व्हिडिअो समाज माध्यमावर व्हाॅयरल झाला. तो व्हिडीअो पाहूण त्यांनी थेट सोलापूर गाठले. आपल्या जन्मदात्या वडिलांना पाहून चारही मुलींच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या आपल्या वडिलांना मिठी मारून रडू लागल्या हे दृश्य पाहून हजर असलेल्या पोलिसांच्या डोळ्यात देखील अश्रू आले. सायंकाळी त्यांच्या मुली भिकाजी पानसरे यांना घेऊन मुंबईला रवाना झाल्या.

पोलिसांच्या वर्दितल्या माणूसकीमुळे अनेक दिवसापासून घरापासून दुर असलेल्या भिकाजी पानसरे यांना आपला परिवार मिळाला. पोलिसांनी केलेल्या कामामुळे त्यांचे सर्व स्तरातून काैतूक होत आहे.