शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धूमाकूळ, अवघ्या अडीच तासात सहा घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धूमाकूळ घालत महिलांच्या गळ्यातील लाखोंचे दोगिने लंपास केल्याच्या सहा घटना सोमवारी सायंकाळी उघडकिस आल्या. सिंहगड रोड परिसरात तीन, वारजे, कोथरुड, वानवडी परिसरात प्रत्येकी एक अशा सहा घटनांमध्ये चोरट्यांनी जवळपास दहा ते पंधरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. सायंकाळी अवघ्या दोन ते तीन तासात एकापाठोपाठ या घटना घडल्या.

मागील काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोऱ्या कमी झालेल्या असताना सोमवारी मात्र चोरट्यांनी अक्षरश : धूमाकूळ घातला. सायंकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान सिंहगड रोड परिसरातील मानाजी बाग, गोयल गंगा या परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील अडीच तोळे व साडेपाच तोळे वजनाचे मंगळसुत्र व गंठण चोरट्यांनी हिसकावले. त्यानंतर वारजे परिसरातील डुक्कर खिंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील ४ तोळे वजनाचे दागिने हिसवण्यात आले. तर कोथरुड येथे भुसारी कॉलनी परिसरात दीड तोळे तर वानवडी येथे रात्री नऊच्या सुमारास विकासनगरमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सीसीटिव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा माग काढला जात आहे. रात्री उशीरापर्यंत सिंहगड रोड, वानवडी, कोथरुड, वारजे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल कऱण्याचे काम सुरु होते.