‘हे’ आगामी राजकीय चित्रपट म्हणजे लोकसभेच्या प्रचाराचा नवा फंडा ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवर चित्रपट बनत असतात. नुकताच ‘ठाकरे’ ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या दोन चित्रपटांच्या ट्रेलर रिलीज नंतर एकच धुमाकूळ घातला. राजकारणामध्ये पूर्वजांची सहानभुती मिळवून निवडणूक जिंकणे सोयीचे जावे, मतदारांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी राजकीय व्यक्ती व पक्षांकडून चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून निवडणूक प्रचार करण्यात येणार आहे. तसेच विरोधकांच्या प्रतिमा मलीन करून प्रतिकूल वातावरण निर्माण करण्यासाठी राजकीय व्यक्ती व पक्षांकडून चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून निवडणूक प्रचार करण्याचा फंडा अलीकडील काळात वापरला जात आहे.
 आता २०१९ मध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्तींवर आधारित काही सिनेमे येणार आहेत त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘ठाकरे’, ‘एनटीआर’, ‘द आयरन लेडी’ आणि ‘ताशकंद’ सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय चित्रपट 
आगामी निवडणुकांसाठी ५ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामधील एका चित्रपटाबाबत न्यायालयाने निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अजून काही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत यामध्येही आक्षेपार्ह टीका टिप्पणी असल्यास विरोध न्यायालयीन लढाया सुरूच राहतील अशी शक्यता आहे.
सोशल मीडियातून कल्पकतेने प्रचार 
सोशल मिडीयाच्या माध्यमातून कल्पकतेने निवडणूक प्रचार केला जातो. आता चित्रपटाच्या माध्यमाचा निवडणुकीतील प्रचारासाठीचा वापर कितपत यश मिळवून देईल हे आगामी निवडणुकांच्या निकालावरून दिसून येईलच. संसदेनंतर आता सिनेसृष्टीत देखील राजकारणाचे वातावरण पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ यांच्यापाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच या सिनेमाचा पोस्टर रिलिज झाला असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. २०१९ या वर्षी लोकसभा निवडणुका देखील आहेत. यासोबतच भारतीय सिनेमांमधून अनेक मोठ्या नेत्यांचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
२०१९  यावर्षी राजकारणाशी संबंधित प्रदर्शित होणारे चित्रपट 
द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर

‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा सिनेमा खूप चर्चेत आहे. हा सिनेमा देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळावर आधारित आहे. या सिनेमात अभिनेता अनुपम खेर मुख्य भूमिका साकारत आहे. हा सिनेमा ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा सिनेमा लेखक आणि मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. विजय रत्नाकर गुट्टे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. हा सिनेमा ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
युपीए २ मधील डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. या काळात सरकारवर विविध भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. त्याचबरोबर गांधी कुटुंबियांचे सरकारवर असलेले नियंत्रणही वादग्रस्त ठरले होते. त्यातच आता लोकसभेची निवडणूक तीन महिन्यांवर आली असताना हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येत असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट आधी आम्हाला दाखविण्यात यावा आणि मगच प्रदर्शित केला जावा, अशीही मागणी काही नेत्यांनी केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. सुधीर ओझा यांनी आपल्या याचिकेत केलेल्या तक्रारीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांची भूमिका निभावत अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. यामुळे मला आणि अनेकांना वाईट वाटलं असल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. तक्रारीत त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांच्याही प्रतिमेला धक्का लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यां विरोधातही तक्रार करण्यात आली आहे.ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत.
‘ठाकरे’

ठाकरे

पाकिस्तानी उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या ‘मंटो’या बायोपिकनंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या ‘ठाकरे’ या सिनेमामुळे खूप चर्चेत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सिनेमावर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत आहे. हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘एनटीआर’ 
खूप दिवसांपासून सिनेमा सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एन.टी.रामा राव यांच्या जीवनावरील बायोपिक खूप चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर खूप चर्चेत आलं आहे. त्यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन आणि रकुल प्रीत सारख्या अभिनेत्री आहेत. एन.टी.रामा राव आंध्रप्रदेशचे दहावे मुख्यमंत्री आहेत.
‘द आयरन लेडी’ 

दक्षिण भारताची दिग्गज अभिनेत्री आणि राजकीय व्यक्तिमत्व जयललिता यांच्यावर बायोपिक तयार होत आहे. जयललिता या साऊथ सिनेमांमधील हिरोईन आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री देखील राहिल्या आहेत. जयललिता यांच ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झालं असून १९९१ ते २०१६ पर्यंत राजकारणात सक्रीय होत्या. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री नित्या मेनन जयललिता यांची भूमिका साकारत आहे.
ताशकंद
सोशल मीडियावर कायम ऍक्टिव असणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर ‘ताशकंद’ हा सिनेमा तयार करत आहे. हा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असून या सिनेमात लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टी दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा देखील रिलीज होताना वाद होण्याची दाट शक्यता आहे.