तब्बल ३ करोड रुपयांच्या घराला ‘कार्डबोर्ड’च्या भिंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘घर बघावे बांधून’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आपलं  स्वतःचं घर असावं असं  प्रत्येकाचेच स्वप्न असतं. पुणे – मुंबई सारख्या शहरात आजच्या परिस्थितीत घर घेणे म्हणजे मोठी गोष्ट मानली जाते कारण या ठकाणी घरांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. पण बऱ्याचदा भरमसाठ पैसे भरून देखील बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

मुंबईतील  शिल्पी थार्ड यांनी तब्बल तीन करोड रुपये खर्चून वडाळा भागातील लोढा ग्रुपच्या रेसिडेन्सी कॉम्प्लॅक्समध्ये आलिशान फ्लॅट विकत घेतला मात्र  या घराच्या बांधकामाची सत्यता जेव्हा समोर आली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. या घराच्या भिंती चक्क कार्डबोर्डच्या निघाल्या. याचा व्हिडीओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्याचे कंत्राटदाराला आदेश  

कार्डबोर्डाच्या भिंतींचं घर 
शिल्पी यांनी आपल्या घराचा एक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये एक बुक्का मारताच त्या भिंतीला मोठं भगदाड पडलेलं या व्हिडिओत दिसतंय. दुसऱ्या एका फायटीत भिंतीला मोठा तडा जातोय. या भिंती सिमेंट आणि विटांच्या नाही तर कार्डबोर्डच्या बनवलेल्या या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय. उल्लेखनीय म्हणजे, या घराची निर्मिती करताना जिप्सम बोर्ड अर्थात ड्रायवॉल किंवा प्लास्टर बोर्डचा वापर करण्यात आला होता.
महत्त्वाचं म्हणजे, शिल्पी यांनी गेल्या वर्षीच या घराचा ताबा घेतलाय. इमारतीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट कसं काय मिळू शकत? असा सवालही या क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. या इमारतीत ड्रेनेज पाईप घराच्या आतमध्ये आहेत… त्यामुळे हे पाईप तुंबले तर काय होऊ शकतं, याची कल्पना तुम्ही करूच शकता.
घरात ड्रेनेजचं काम सुरू असताना एका थर्ड पार्टी आर्किटेक्टला बोलावून चौकशी केली तेव्हा घराच्या भिंती खूपच तकलादू असल्याचं लक्षात आलं, अशी माहिती शिल्पी यांनी दिलीय. या भिंतींमधून पाणी तर सहजच झिरपू शकतं. इतकंच नाही तर आग लागली तर हे घर अगदी सहजच आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकतं.
बिल्डरने आरोप फेटाळला 
लोढा ग्रुपनं मात्र हा व्हिडिओ खोटा असल्याचा सांगत शिल्पी यांचा आरोप फेटाळून लावला. शिल्पी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना यासंदर्भात एक पत्र लिहून बिल्डर विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केलीय.