यंदा द्राक्षांची आवक वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मार्केट यार्ड येथील फळ बाजारात रविवारी ( ता. 3 ) द्राक्षाची या हंगामातील सर्वात मोठी आवक झाली. हवामानात झालेल्या बदलामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी मालाची तोडणी करण्यावर भर दिल्याने ही आवक वाढली.

रविवारी बाजारात सुमारे 65 टन इतकी द्राक्षांची आवक झाली. याबाबत बोलताना व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, “गेल्या महिन्यापासून द्राक्षांचा हंगाम भरात आलेला आहे. रविवारी ही आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. साधारणपणे मकरसंक्रांतीनंतर आवक वाढत जाते. सध्या हवेतील गारवा वाढला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांनी द्राक्षांची तोडणी करून बाजारात विक्रीला पाठविण्यावर भर दिल्यामुळे रविवारी द्राक्षांची आवक 60 ते 65 टन इतकी झाली.ही यावर्षच्या हंगामातील मोठी आवक ठरली आहे.

“पुण्याच्या बाजारात पुणे जिल्हा सांगली, सोलापूर, सातारा येथून असते. पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन होते. यामध्ये प्रामुख्याने कृष्णा, जम्बो, शरद सीडलेस यांचा समावेश असतो. सुपर सोनाका, तासगाव गणेश, माणिक चमन या वाणांचे उत्पादन सांगली सातारा आदी भागात घेतले जाते. जुंम्बो या प्रकारचे द्राक्ष काळ्या रंगाचे असून त्याचा कार जांभळा एवढा असतो. कृष्णा, शरद सीडलेस निखिल हे देखील काळया रंगाचे असतात. तर इतर वाण हे पिवळ्या रंगाची असतात. त्यांचा आकार लांबट असतो. पुण्याच्या बाजारात जम्बो द्राक्षाच्या प्रति दहा किलो ला चारशे रुपये ते सातशे रुपये इतका भाव मिळाला. कृष्णा या द्राक्षाला प्रति दहा किलोला चारशे ते साडेसहाशे रुपये इतका भाव मिळाला. शरद सीडलेस या द्राक्षाला प्रति 15 किलो पाचशे ते आठशे रुपये, सुपर सोनाका प्रति 15 किलो 600 ते 900 रुपये, तासगाव गणेश प्रति 15 किलो पाचशे ते सातशे रुपये, माणिक चमनला प्रति 15 किलोला साडेचारशे ते सहाशे रुपये इतका भाव मिळाला. पुण्यातील बाजारातून देशातील इतर भागातही द्राक्ष मोठ्या प्रमाणावर विक्रीला पाठवली जातात.