तलवारीसह तिघांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – तलवार बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने पाथर्डी येथून जेरबंद केले आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील चौकशीसाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अटक केलेल्यांमध्ये गणेश बन्शी पडळकर (वय- ४२ वर्षे, रा. नाथनगर. पाथर्डी), दादासाहेब सुभाष मोहीते, (वय- १९ वर्षे, रा. रामगिरीबाबा टेकडी, पाथर्डी), राजू सिताराम भोसले (वय- ४२ वर्षे, रा. सदर) यांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई रोहन खंडागळे, पोलीस कर्मचारी सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, सुरज वाबळे, भागीनाथ पंचमूख, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, योगेश सातपुते, सचिन कोळेकर आदींचे पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्याचा तपास करीत असताना होते.

त्यावेळी पोसई रोहन खंडागळे यांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली कि, पाथर्डी येथील कोरडगांव चौकदत्त वेल्डींग दुकानासमोर काही इसम धारदार तलवार घेवून थांबलेले आहेत. आता गेल्यास मिळून येतील, अशी खात्रीशीर माहीती मिळाली. त्यामुळे खंडागळे यांनी लागलीच दोन पंचाना बोलावून त्यांना मिळालेली माहीती कळविली. त्यानंतर पंचासह पाथर्डी पो.स्टे. येथून कोरडगाव चौक, दत्त वेल्डींग दुकानासमोर पायी जावून मिळालेल्या बातमीनूसार खात्री केली असता सदर ठिकाणी दुकाणासमोर काही इसम उभे असलेले दिसले. त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच ते पळून जावू लागले.

पथकातील कर्मचाच्यांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता राजू सिताराम भोसले याचे अंगझडतीत तलवार मिळून आली. सदरची तलवार ही गणेश व दादासाहेब मोहीते यांना विक्री करण्यासाठी आणली असल्याचे सांगितले. तीन इसमांना तलवारीसह ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आली आहे.