दरोड्याच्या तयारीतील ३ सराईत गुन्हेगार पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकण्यापूर्वीच तीन सराईत गुन्हेगारांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

शुभम महेंद्र सोनवणे (वय ३० रा. शिवाजीनगर), मंगेश ऊर्फ भज्या संजय  पवार (रा. कोंढवा, कुमार ऊर्फ कुम्या बाळकृष्ण खुडे (वय – २३ रा. वाकडेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गवळी हे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलीस नाईक भांदुर्गे, शिंदे यांनी तीन सराईत गुन्हेगार ज्वेलरीच्या दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तर त्यांच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. मंगेश उर्फ संजय पवार याच्यावर फरासखाना, कोंढवा, दत्तवाडी पोलीस ठाण्यात १० गंभीर गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तर कुमार उर्फ कुम्या खुडे याच्यावर चार तर शुभम सोनवणे याचेवर दोन गुन्हे दाखल आहेत.

हि कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग रविंद्र सेनगांवकर, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे संभाजी शिर्के, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गवळी, पोलीस हवालदार बापुसाहेब खुटवड, केदार आढाव, पोलीस नाईक दिनेश भांदुर्गे, विनायक शिंदे, गणेश ढगे, सयाजी चव्हाण, विशाल चौगुले, अमोल सरडे, पोलीस शिपाई हर्षल शिंदे, मोहन दळवी, आकाश वाल्मीकी, अमेश रसाळ, महावीर वलटे, मयुर भोकरे यांच्या पथकाने केली.