माथेफिरू तरुणाचा प्रताप : पोलीसांना धक्काबुक्की ; सहायक निरीक्षकाच्या कारवर दगडफेक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आल्यानंतर गोंधळ घालणाऱ्याला तरुणाला शांत करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या कारवरच सिमेंट पेहर ब्लॉक मारून नुकसान केल्याचा प्रकार अप्पर इंदिरा नगर पोलीस चौकीसमोर घडला. दगड मारल्यानंतर तरुण तेथून पसार झाला. याप्रकरणी त्याच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस चौकीत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई केतन विष्णू लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर नितनवरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी केतन लोखंडे हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते अप्पर इंदिरा नगर पोलीस चौकीत असताना नितनवरे तेथे आला. त्याला मारण्यासाठी काही पोरं आली आहेत. त्यामुळे लवकर घरी चला अशी विनंती पोलीस चौकीत केली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक भूषण आडके यांनी त्याच्याकडे चौकशी करून बीट मार्शलला त्याच्या पत्त्यावर रवाना केले. त्यांनी पाहणी करून आल्यावर तसा काही प्रकार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर तो चौकीत काही वेळाने पुन्हा आला आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागला. त्यामुळे त्याला खोटी तक्रार देऊ नको तसा काही प्रकार नाही. असे लोखंडे यांनी सांगितले. तेव्हा त्याला राग आल्याने त्याने लोखंडे यांची कॉलर पकडून बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आडके यांनी त्याला बाजूला घेऊन शांत करत चौकीच्या बाहेर उभे राहण्यास सांगितले. त्यावेळी तो अप्पर पोलीस चौकीच्या आवारात पार्क केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक आडके यांच्या कारवर पेव्हर ब्लॉक मारून काच फोडून तेथून पळून गेला.