संतापजनक ! २ महिन्याच्या चिमुकलीचा केला परित्याग ; हाॅटेलसमोर दिले फेकून

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – २ महिन्याच्या चिमुकलीचा परित्याग करण्यासाठी कोणीतरी अज्ञात व्यक्तिने तिला हाॅटेल समोर फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेल व्यावसायिक दयाशंकर बाबाजी गुप्ता ( वय – ३५ वर्षे, रा. खालुंब्रे, ता. खेड,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीसनांनी दिलेल्या माहितीनूसार, चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी ( ता. खेड ) गावच्या हद्दीत गुप्ता यांचे हॉटेल आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ते नेहमी प्रमाणे हॉटेल उघडण्यासाठी आले असता हॉटेल समोर त्यांना एक प्लास्टिक पिशवी दिसली. यावेळी त्यांना वाटले की, भाजीवाल्याने आज लवकरच भाजी आणून दिली असावी, या हेतूने ते पिशवी उचलण्यासाठी गेले असता त्या पिशवीत त्यांना काहीतरी हालचाल होत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने ती पिशवी उघडून पाहिली असता त्यात एका चादरी मध्ये गुंडाळून ठेवलेले एका दोन महिन्यांच्या स्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आले. त्यांनी ताबडतोब याबाबत चाकण पोलिसांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली.

चाकण पोलिसांनी तातडीने सबंधित ठिकाणी धाव घेवून त्या अर्भकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळाचा त्वरित पंचनामा करून सबंधित मुलीला अधिक उपचारासाठी चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ती मुलगी जिवंत असून, तिची तब्येत ठणठणीत असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सबंधित मुलीला देवाची आळंदी जवळील वडमुखवाडी येथील रेणुका शिशु आहार या केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद भोसले व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.