शरद पवार उद्या माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

सांगोला : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्य भर दौरे करण्याचा सपाटा सुरु केला असून उद्या शरद पवार हे माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. सांगोला येथे दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्‍त विद्यमाने उद्या ९ फेब्रुवारी रोजी सांगोल्यामध्ये दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दुष्काळ परिषदेला शरद पवार आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आज आ. गणपतराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेला दिली आहे. ते सांगोल्यात बोलत होते.

सांगोल्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात होणार्‍या या दुष्काळी परिषदेला दुपारी एक वाजता सुरुवात होणार आहे. या परिषदेचे उदघाटक हे शरद पवार असणार आहेत. शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, अपूर्ण असणार्‍या टेंभू, म्हैसाळ, सांगोला शाखा व इतर सिंचन योजना त्वरित पूर्ण कराव्यात, जनावरांसाठी चारा छावण्या किंवा चारा डेपो त्वरित सुरू करण्यात यावेत, माणसे व जनावरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यात यावा, लोकांना कामे देण्यासाठी नवीन विहिरी-शेततळे, पाणंद रस्ते, शेतरस्ते आदी कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, पावसाअभावी पेरण्या न झालेल्या व करपून गेलेल्या पिकासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी हि परिषद घेण्यात येणार आहे.

माजी आ. दीपक साळुंखे-पाटील आणि माजी. जि.प. सदस्य बाबासाहेब कारंडे यांनी या दुष्काळ परिषदेसाठी आमदार गणपतराव देशमुखांना साथ दिली आहे. आज घडलेल्या राजकीय घडामोडीवर उद्या होणाऱ्या माढा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सांगोला शहरात शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.