वाहतूक पोलिसांची अरेरावी, वाहनचालकांचा मानसिक छळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (कुमार चव्हाण) – हेल्मेटसक्ती असो की सिग्नल तोडलेला असो किंवा ट्रिपलसीट दुचाकी चालवणे असो वाहतूक पोलीस वेळोवेळी योग्य ती कारवाई करतातच. परंतु अनेकदा सामान्य माणसाशी वर्तणूक करताना पोलिसांकडून गुन्हेगारासारखी वर्तणूक केली जाते. शिवाय त्यांच्याशी बोलतानाही  कठोर शब्द वापरत त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. काल (दि. 13 जानेवारी) अशीच एक घटना समोर आली आहे. अशा घटना रोजच होतात परंतु प्रत्येक घटना समोर येतातच असे नाही.

हडपसरमध्ये तरुणाचा चाकूने सपासप वार करुन खून 

काल (रविवार- दि. 13 जानेवारी) सकाळी 10 च्या सुमारास कोथरूड वाहतूक विभागाजवळ प्रवीण अडसुरे आणि वैभव खेडकर आणि आणखी एक मित्र एका गाडीवर ट्रिपलसीट जाताना वाहतूक पोलिसाने त्यांना पकडलं. वैभव आणि प्रविण सोबत असणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीची गाडी खराब झाल्याने ते ट्रीपलसीट जात होते. गाडी पकडल्यानंतर त्यांची गाडी सदर पोलिसाकडून कोथरूड वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये नेण्यात आली. तेथे गाडी नेल्यानंतर सदर पोलीस पुढील बंदोबस्तासाठी निघून गेले. जाताना मात्र त्यांच्या हाताखाली जी मुलं गाडी उचलण्यासाठी असतात त्यापैकी टेम्पो ड्रायव्हर असणाऱ्या ड्रायव्हर मुलाकडे ती गाडीची चावी देण्यात आली. त्यानंतर ते पुढील बंदोबस्तासाठी निघत होते इतक्यात प्रवीणने गाडीची चावी तुमच्याकडेच आहे असल्याचं आठवण करून देत ती चावी ‘आमच्याकडे नको देऊस पण किमान ऑफिसमध्ये साहेबांकडे ठेवून जा’ असे सुचवले. परंतु त्याने चावी ठेवण्यास नकार देत कठोर शब्दात त्याला ‘साहेबांशीच बोल, चावी देता येणार नाही’ असं सांगण्यात आलं.
यानंतर प्रवीण आणि वैभव कोथरूड वाहतूक विभागाच्या कार्यालयात गेले. तेथेच त्यांची गाडीही नेण्यात आली होती. वैभव खेडकर हे स्वत: पत्रकार आहेत. कोथरूड वाहतूक विभाग कार्यालयात गेल्यानंतर तेथे असणाऱ्या दोन पोलिसांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मात्र तेथील कार्यालयातील एका पोलिसाने, ‘तुम्ही कोणीही असोत परंतु तुम्हाला ज्या साहेबांनी तुमची गाडी पकडली ते येईपर्यंत थांबावं लागेल शिवाय ज्यांनी गाडी पकडली तेच काय ते बघून घेतील’ असे सांगतिले. ‘वैभव खेडकर यांनी गाडीची चावी काढून घेणे चुकीचे नाही का साहेब?’ असा सवाल करताच कार्यालयतील दुसऱ्या पोलिसाने मात्र आवाज चढवत कठोर शब्दात त्यांना प्रतिक्रिया दिली. ‘तू काय चूक बरोबर सांगतोस रे’ अशा भाषेत त्यांना सवाल केला. यानंतर प्रविण आणि वैभव हे दोघे कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या त्यांच्याच गाडीपाशी थांबले असता त्यांना, ‘तेथे थांबू नका’ असे म्हणत आवाराच्या बाहेर जाऊन थांबण्यास सांगितले. यानंतर प्रविण याने ‘काॅमन मॅन पोलीस स्थानकात थांबू शकत नाहीत का ?’ असे विचारताच त्यावर पोलिसांनी, ‘नाही थांबू शकत’ अशी प्रतिक्रिया दिली.
तब्बल दोन तास  वाट पाहिल्यानंतरही ज्या पोलिसाने गाडी पकडली होती, ते येत नाहीत हे पाहून वैभव यांनी पुन्हा एकदा कार्यालयात संपर्क साधला. ‘गाडी पकडणारे पोलीस आले नाहीत तर किमान तुम्ही त्यांना काही संपर्क करा’ अशी विनंती केली. त्यावर त्यांनी संपर्क न करताच, ‘ते येतील तेव्हाच बघू’ असं सांगितलं. शिवाय तुम्ही आता आवारात थांबू नका असेही सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी अशा प्रकारे गाडीची चावी काढणं शिवाय, गाडी उचलणाऱ्या मुलांकडे चावी देणं याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. गाडी पकडणारे पाेलीस जरी कामानिमित्त बाहेर गेले असतील तर तेथील कार्यालयातील पोलिसांकडून काही संपर्कही न करणं कितपत याेग्य आहे? तसेच पोलिसांच्या आपापसात काही कम्यनिकेशन नाही का? असा सवालही उपस्थित केला आहे. पोलिसांनी कारवाई करणं याेग्य आहेच परंतु सामान्य माणसांना असं गुन्हेगारासारखं वागवणं आणि बोलताना कठोर शब्द वापरणं कितपत याेग्य आहे? असा सवाल उठवला आहे.
या घटनेबाबत माहिती देताना पत्रकार वैभव खेडकर म्हणाले की, “प्रवीण आणि मी आमच्या आणखी एका मित्रासोबत त्याची गाडी खराब झाल्याने ट्रिपल सीट जात होताे. कोथरूड वाहतूक विभागाजवळ आम्हाला पोलीसांनी आडवलं. अडवल्यानंतर गाडी कोथरूड वाहतूक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आली. परंतु गाडीची चावी आमच्याकडे किंवा कार्यालयात न ठेवताच चावी जी मुलं गाडी उचलतात त्यांच्यापैकी एका मुलाकडे देण्यात आली. कोथरूड वाहतूक विभागातील कार्यालयात जाऊन तेथे उपस्थित पोलिसांशी संवाद साधून  घडला प्रकार त्यांना सांगितला. परंतु यावर त्यांनी व्यवस्थित प्रतिक्रिया दिली नाही. याउलट त्यांनी बाहेर थांबण्यास सांगितले. इतकेच नाही तर त्यांनी कार्यालयाच्या आवारतही थांबण्यास मनाई केली. मी पत्रकार असल्याचंही मी त्यांना सांगतिलं होतं. आणि गाडीची चावी काढून घेणं चूक नाही का साहेब असे नम्रपणे विचारलं त्यावर त्यांनी अरेरावी करत, ‘काय रे चूक बरोबर काय सांगायला लागला’ अशा शब्दात अपमानास्पद वागणूक दिली. कार्यालयातील पोलिसांशी बोलल्यानंतर त्यांनी गाडी पकडणाऱ्या पोलिसांशी कोणताही संपर्क केला नाही. मी याबाबत कमीशनर आॅफिसशी संपर्कही केला होता. त्यांना घडला प्रकार कथन केला. त्यानंतर मात्र पुढील प्रक्रियेस गती येताना दिसली.”
प्रवीण अडसुरे म्हणाला की, “गाडी अडवली तेव्हा मी गाडी बाजूला घेतली. मला लायसन्सच्या आधी एटीएमची विचारणा करण्यात आली. मी गाडीची चावी काढल्यानंतर पाेलिसांच्या हाताखाली गाडी उचलणाऱ्या मुलांपैकी एकाने माझ्या हातातून चावी घेतली. गाडी कार्यालयाच्या आवारात नेली. त्यानंतर चावी माझ्याकडे न देता स्वत:कडे ठेवली. शिवाय पुढील बंदोबस्तासाठी तो बाहेर जाताना तो चावी सोबतच घेऊन गेला. तो जात असताना मी त्याला चावी कार्यालयात ठेवण्याची विनंती केली परंतु त्याने आवाज चढवत वक्तव्य केलं. ‘काय असेल ते साहेबांशी बोल जा’ असं सांगितलं. अतिशय अपमानास्पद वर्तणूक त्याने केली. यानंतर कार्यालयातील साहेबांशीही आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र  त्यांनी गुन्हेगारासारखं आवाज चढवत वक्तव्य केलं. शिवाय आवारात थांबण्यास मनाई केली. ‘सामान्य माणूस आवारात थांबू शकत नाही का?’ असा सवाल केल्यानंतर मात्र त्यांनी, ‘नाही थांबू शकत’ असं उत्तर दिलं. शिवाय दोन तास आम्हाला वाट पाहावी लागली. पोलीस आणि त्यांच्या हाताखाली गाडी उचलणारी मुलेही गाडी पकडल्यानंतर आमच्याशी बोलताना अरेरावीच्या भाषेत बोलतात तसेच गुन्हेगारासारखी अपमानास्पद वागणूक देतात. साहेब असल्यासारखे वागतात.”
वैभव आणि प्रवीण यांच्यासोबतच आणखीही एक गाडी ट्रीपल सीट जाताना पकडण्यात आली. त्यातील धनंजय म्हेत्रे याने सांगितले की, “ट्रीपल जाताना आमची गाडी पकडल्यानंतर आमच्या गाडीची चावी पोलिसांच्या हाताखाली असणाऱ्या गाडी उचलणाऱ्या मुलांकडे देण्यात आली. आमच्याकडून पैसे घेण्यासाठी आमचे खिसे उचकण्यात आले. कठोर शब्दात बोलण्यात आलं.”
यातील आेम बुऱ्हाडे म्हणाला की, “आमची गाडी पकडून दोन तास झाले होते. गाडी उचलणाऱ्या मुलाकडे आमच्या गाडीची चावी होती. तब्बल दोन तास वाट पाहूनही आमच्या गाडीची चावी नेणारा मुलगा आणि संबंधित पोलीस परतले नव्हते.”
प्रतिक लोखंडे म्हणाला की, “गाडी पकडल्यानंतर आम्हाला दंड सांगितल्यानंतर पैसे घेण्यासाठी माझं वाॅलेट तपासलं. तेही पोलिसांनी न तपासता गाडी उचलणाऱ्या मुलाने तपासलं. शिवाय पोलिसांनी आणि त्या मुलाने अतिशय कठोर शब्दात वक्तव्य केलं. शिवाय एकाच गाडीवरील आम्हा तिघांना दंड सांगतानाही वेगळ्या माणसाने वेगवेगळा दंड सांगितला. एकाने 2200 रुपये  तर एकाने 1400 रुपये  सांगिले.”
पोलीस नेहमीच आपलं काम कायद्याच्या चौकटीत राहून चोख पार पाडत असतात. त्याबाबत सर्वच त्यांचा आदर करतात. परंतु अनेकदा ते सामान्य माणसाशी बोलताना किंवा त्यांच्याशी वर्तणूक करताना अतिशय कठोर शब्द वापरत गुन्हेगारांशी बोलावं तसंच अपमानास्पद बोलतात याबाबत मात्र संताप व्यक्त केला जात आहे.